नागोठणे-शिहू मार्गावर झाडांच्या फांद्या कापल्या; स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप
| नागोठणे | प्रतिनिधी |
अंबानी समूहाच्या नागोठणे परिसरात असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विस्तारित प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी रिलायन्स कंपनीच्या आतील भागात असलेल्या शेकडो झाडांची कत्तल केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिकांतून सुरू आहे. असे असतानाच नागोठणे- शिहू-पोयनाड मार्गालगत असलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दिवसाढवळ्या सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे प्रकल्पाला लागूनच असलेल्या नागोठणे-पोयनाड मार्गावरील नागोठण्याहून शिहू बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि कडसुरे ते कुहीरे गावांच्या दरम्यान रस्त्यालगत असलेली आणि उंचच उंच वाढलेल्या महाकाय वृक्षांच्या मोठमोठ्या फांद्या तोडण्याचे काम शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी भरदिवसा सुरू होते. यासाठी रिलायन्स कंपनीचे अधिकारी, कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक अशी पंधरा ते वीस जणांची टीम तैनात करण्यात आली होती. झाडे तोडण्यासाठी रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या उंच मशीनमध्ये एक व्यक्ती हातात कटर घेऊन रस्त्यालगतच्या मोठमोठ्या फांद्या कटरच्या सहाय्याने कापत असल्याचे यावेळी दिसून आले. यासंदर्भात रिलायन्स कंपनीच्या उपस्थित अधिकाऱ्यांशी प्रस्तुत प्रतिनिधीने चौकशी केली असता कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी मोठी यंत्रे येणार असल्याने या यंत्रांना अडथळा नको म्हणून झाडांच्या फांद्या कापण्यात येत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. मात्र, झाडांच्या फांद्या कापण्याच्या कामाची वन खात्याची आवश्यक परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर रिलायन्सचे अधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे वनखात्याचा यांना आशीर्वाद आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तसेच यामुळे प्रकल्प उभारणीच्या कामात रिलायन्स प्रशासनाची मनमानी सुरूच असल्याचे वारंवार दिसून येत आहे.





