| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यातील हायवे नाका हा प्रवासासाठी अंत्यत महत्त्वाचा नाका समजला जातो. कोकणात जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या एस.टी. गाड्या तसेच कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या नागोठण्यातील याच हायवे नाक्यावर थांबतात. पंरतु, महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून या हायवे नाक्यावर प्रवासी शेड नसल्याने एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना उन्हात ताटकळत राहण्याची नामुष्की ओढावली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या नागोठणे बस स्थानकात पनवेल, मुंबई तसेच माणगाव, महाडकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या मर्यादित आहे. त्यातील अनेक एस.टी. बसेस नागोठण्यातील हायवे नाका येथे थांबतात. त्यामुळे नोकरीनिमित्त नागोठण्यातून ये-जा करणारे कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना हायवे नाक्याचा खूप मोठा आधार मिळतो. मात्र, महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून याठिकाणी प्रवासी शेड नसल्यामुळे दोन्ही बाजूकडील प्रवाशांना उन्हात ताटकळत राहून एसटीची वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रवासी वर्गातुन नाराजीचे सुर उमटत असून, नागोठण्यातील हायवे नाक्यावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला लवकरात लवकर प्रवासी शेड उभारण्यात याव्यात, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.






