लाठी-काठी व तलवारबाजीचे थरारक प्रात्यक्षिक; अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या समवेत बसण्याचा मान
| महाड | प्रतिनिधी |
अहमदाबाद येथील वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित 18व्या अक्षय कुमार इंटरनॅशनल कूडो स्पर्धेत महाडच्या शिवकन्या श्राव्या शिरशिवकर हिने आपल्या मर्दानी खेळांच्या दमदार सादरीकरणातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लाठी-काठी आणि तलवारबाजीचे कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर करत हातात तलवार-ढाल घेऊन केलेल्या शिवगर्जनेने तिने मराठमोळ्या शौर्यपरंपरेचा परिचय करून दिला.
तिच्या सादरीकरणातून शौर्य, आत्मविश्वास आणि शिवकालीन मर्दानी परंपरेची झलक पाहायला मिळाली. शौर्य गुरुकुलचे मंगेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्राव्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेत आहे. सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर तिने आत्मसात केलेल्या कौशल्याचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या भव्य मंचावर करण्याची संधी तिला मिळाली. या स्पर्धेसाठी श्राव्याला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. तिला मंचावर आमंत्रित करून अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या समवेत बसण्याचा बहुमान देण्यात आला.
श्राव्याच्या या यशस्वी वाटचालीत तिचे आई-वडील सौरभ शिरशिवकर आणि दिशा शिरशिवकर यांचाही मोलाचा सहभाग आहे. मुलीच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, तिच्या प्रशिक्षणासाठी सातत्याने पाठबळ देणे आणि प्रत्येक टप्प्यावर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच श्राव्याला आपले कौशल्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी उपस्थित होते. तसेच महाराणा ऑफ मेवाड चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त लक्ष्याराज सिंह मेवाड आणि त्यांच्या पत्नी निवृत्ती कुमारी मेवाड यांचीही उपस्थिती होती. 15 ते 18 नोव्हेंबरदरम्यान आयोजित या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. लाठी-काठी, तलवारबाजी आणि शिवगर्जनेच्या माध्यमातून आपली कला सादर करणाऱ्या श्राव्या शिरशिवकर हिचे महाडमध्ये कौतुक होत आहे.






