वनसंपदेसह पशु-पक्ष्यांची वाताहत; किल्ला संवर्धनाच्या कामावर पाणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील प्राचीन व ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावर वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे किल्ल्याची होरपळ होत आहे. त्यामुळे येथील वनसंपदा व पशुपक्ष्यांची देखील वाताहत होत आहे. तसेच, सरसगड किल्ल्यावर स्थानिक दुर्गप्रेमी, विविध दुर्ग संवर्धन संस्था व संघटनांकडून स्वच्छतेची कामे सुरु आहेत. तसेच, वृक्षारोपण देखील केले जात आहे. मात्र, या मानवनिर्मित वणव्यांमुळे त्यांच्या कामावर पाणी फेरले जात असून, त्यांच्यातून नाराजीचे सुर उमटत आहेत.
शिवाजी महराजांनी सरसगडाचे महत्त्च ओळखून गडास स्वराज्यात दाखल करुन घेतले होते. तसेच, या सरसगडाच्या दुरुस्तीसाठी 2 हजार होण देखील मंजुर केल्या होत्या. त्यानुसार दुर्गमता व विपूल जलसंचय यावर विशेष भर देऊन गडाची बांधणी करण्यात आली. दुरवर टेहाळणी करण्यास व इशारा देण्यास “सरस” म्हणून या किल्ल्याला सरसगड नाव देण्यात आल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, हा ऐतिहासिक किल्ला मानवनिर्मित वणव्यात होरपळत चालला आहे. मागील आठवड्यात सरसगडावर मानवनिर्मित वणवा लागून किल्ल्याचा बहुतांश भाग जळून होरपळला आहे. या वणव्यामुळे किल्ल्यावर नव्याने लावलेली रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली आहेत. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच, त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, धोकादायक ठिकाणी जाता न आल्याने किल्ल्याच्या परिसरातील बहुतांश परिसरातील झाडे जळून खाक झाली आहेत. सर वणव्यामुळे जळून काळाकुट्ट झालेला किल्ला पाहताना दुर्गप्रेमींना दुःख होत आहे.
वणव्यांमुळे वाताहत
ऐतिहासीक सरसगड किल्ल्याच्या चारही बाजूने वणवे लागल्यामूळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामूळे येथे राहणाऱ्या पशूपक्ष्यांची अन्नपाण्यासाठी खुप वाताहत होत आहे. त्यामुळे येथे राहणारे पक्षी, माकड, वानरे व इतर प्राणी अन्नपाण्यासाठी पाली शहरात व आजूबाजूच्या गावात येत आहेत. त्यामुळे या प्राण्यांसह स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच, या वणव्यांमुळे सरसगडाची तटबंदी, बुरुज इत्यादी बांधकामे देखील सैल पडून वेळेस दगड खाली घरंघळत आहेत. त्यामुळे किल्ल्या ढासळण्यासह एखादी दुदैवी घटना घडण्याची भीती दुर्गप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
वणव्यांमुळे सरसगड किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू, वनसंपदा व जैवविविधतेचे प्रचंड नुकसान होत आहे. अनेकदा जीवाची बाजी लावून येथील वणवे विझवले आहेत. किल्ल्यावर अथक परिश्रम करून झाडे लावून ती वाढवण्यासाठी व जोपसण्यासाठी मेहनत घेत आहोत. जे कोणी लोक वणवा लावत आहेत त्यांना शोधून कडक शासन करण्याची गरज आहे. गेली अनेक वर्षे सरसगड व इतर ठिकाणी लावलेली व संवर्धन केलेली झाडे सततच्या वनव्यांना बळी गेली आहेत. याचे खूप दुःख होते.
केतन म्हसके,
उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान, पाली






