कोप्रोलीत पोलीस बंदोबस्तात मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध
| उरण | प्रतिनिधी |
न्यायालयाची स्थगिती असतानाही कोप्रोलीत जमीन मोजणीचा प्रयत्न झाल्याने शेतकरी संतप्त झाले. बेस्ट रोडवेजचे मालक जयकुमार गजानन गुप्ता यांच्या मागणीनुसार, शासकीय अधिकारी पोलीस बंदोबस्तात मोजणीसाठी दाखल होताच ॲड. पर्जन्य म्हात्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. न्यायालयाचा आदेश आणल्याशिवाय मोजणी होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा घेत शेतकऱ्यांनी ही कार्यवाही रोखली.
गुप्ता गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप असून, 15 हून अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात दावे दाखल केले आहेत. पनवेल आणि उरण दिवाणी न्यायालयाचे आदेश असतानाही दोन प्रकरणांत ते झुगारून रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि गोडाऊन उभारल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पिकत्या जमिनीत भराव टाकून काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले. यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत, रॉयल्टीही भरली नसल्याचा दावा ॲड. म्हात्रे यांनी केला. शेतकऱ्यांच्या जागेत कंटेनर आणि टेम्पो उभे करून जमिनीचा व्यावसायिक वापर केला जात असल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. अनधिकृत वेअरहाऊसमध्ये दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
याबाबत पोलीस, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए आणि तहसीलदारांकडे वारंवार तक्रारी करून, मोर्चे काढूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणा गुप्ता यांच्या अर्जावर मात्र तत्परतेने हालचाल करते, अशी टीका आंदोलकांनी केली.
न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत जमीन मोजणी करू नये. शेतकऱ्यांच्या जमिनीतील बेकायदा रस्ते, वेअरहाऊस आणि उभी केलेली वाहने तातडीने हटवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.






