धार्मिक सोहळ्यांसह बाजारपेठा सजणार; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याला यात्रांची समृद्ध परंपरा लाभली आहे. भात कापणीचा हंगाम संपल्यानंतर कार्तिकी एकादशीपासून सुरू होणारा यात्रांचा उत्सव यंदाही गावागावांत रंगणार आहे. शनिवारपासून (दि. 21) साजगावच्या बोंबले विठोबाच्या यात्रेला सुरुवात झाली असून, त्यापाठोपाठ आवास, कनकेश्वर, वरसोली आणि चौल-भोवाळे येथील यात्रांमुळे डिसेंबरअखेरपर्यंत रायगड जिल्हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
खालापूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साजगाव येथील विठ्ठलाचा उत्सव कार्तिकी एकादशीपासून सुरू झाला आहे. त्यानंतर सोमवारी (दि.23) अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वर यात्रा भरणार आहे. मंगळवार (दि.24) आणि बुधवार (दि.25) नोव्हेंबर रोजी कनकेश्वर यात्रा होणार आहे. वरसोली येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात 4 डिसेंबरपासून उत्सवाला सुरुवात होणार असून, यानिमित्त पाच दिवस यात्रा भरणार आहे. तर, चौल-भोवाळे येथे 23 डिसेंबरपासून दत्तजयंती सोहळा आणि यात्रेची लगबग सुरू होणार आहे.
या प्रमुख यात्रांमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उत्सवमय होणार आहे. यात्रांच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होणार असून, धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू, पूजेचे साहित्य आणि खेळण्यांची दुकाने सजणार आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि विक्रेत्यांना रोजगाराची संधी मिळणार असून, ग्रामीण बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढाल वाढणार आहे.
नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले चाकरमानी, नातेवाईक आणि माहेरवाशिणीही यात्रेच्या निमित्ताने पुन्हा गावाकडे परतणार आहेत. त्यामुळे गावागावांत नात्यांची भेट, परंपरांचा जागर आणि उत्सवाचा आनंद अनुभवायला मिळणार आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाबरोबरच व्यापार, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा रायगडचा यात्रोत्सव यंदाही विशेष ठरणार आहे.
यात्रांचे वेळापत्रक
* 21 नोव्हेंबर : साजगाव बोंबले विठोबा यात्रा
* 23 नोव्हेंबर : आवास नागेश्वर यात्रा
* 24 व 25 नोव्हेंबर : कनकेश्वर यात्रा
* 4 डिसेंबर : वरसोली विठ्ठल-रखुमाई पाच दिवस यात्रा
* 23 डिसेंबर : चौल-भोवाळे यात्रा






