धरणे, पक्के बंधारे, अपूर्ण जलजीवन योजनांना मुहूर्त कधी?
| माणगाव | प्रतिनिधी |
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्याऐवजी उन्हाळ्यात टँकरच्या मागे धावण्याची वेळ रायगडकरांवर येत आहे. माणगाव तालुक्यात ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारलेल्या 115 वनराई बंधाऱ्यांनी पाणीटंचाईला काहीसा दिलासा दिला असला, तरी कायमस्वरूपी जलसाठ्याचा प्रश्न कायम आहे. समृद्धी महामार्ग उभा राहिला; मग रायगडला जलसमृद्ध करणारे प्रकल्प कधी पूर्ण होणार, हा सवाल आहे.
माणगाव तालुक्याला 200 वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, 115 बंधारे पूर्ण झाले आहेत. उर्वरित 85 बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. पंचायत समितीचे सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा मालुरे आणि गटविकास अधिकारी शुभदा पाटील-कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.
होडगाव ग्रामपंचायतीच्या जांभूळवाडी येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून नदीवर बंधारा उभारला. त्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा वाढून तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलला दिलासा मिळाला आहे. पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. लोकसहभागातून जलसंवर्धन शक्य असल्याचे या उपक्रमाने दाखवून दिले आहे.
मात्र, वनराई बंधारे हा कायमस्वरूपी उपाय नाही. माणगावमधील कुंभे जलविद्युत प्रकल्प वर्षानुवर्षे अपूर्ण आहे. पन्हळघर धरणाच्या पाण्याचा सिंचनासाठी अपेक्षित वापर होत नाही. माकटी, चेरवली आणि डोंगरोली येथील प्रस्तावित धरणांनाही गती मिळालेली नाही. दुसरीकडे जलजीवन मिशनची अनेक कामे अपूर्ण असल्याने गावांतील पाणीप्रश्न कायम आहे.
रायगडमध्ये मुबलक पाऊस पडतो; मात्र पावसाचे पाणी नद्या-नाल्यांतून थेट समुद्राला मिळते. उन्हाळ्यात त्याच जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. नद्यांवरील पक्के बंधारे, लघुसिंचन प्रकल्प, गाळ उपसा आणि अपूर्ण धरणांची कामे पूर्ण करण्याची गरज आहे.






