अधिकाऱ्यांचा थेट नागरिकांशी संवाद
| पनवेल | प्रतिनिधी |
आरटीओ कार्यालयातील कामांसाठी दलालांवर अवलंबून राहावे लागत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कडक पावले उचलली आहेत. नागरिकांची दिशाभूल आणि आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी प्रादेशिक अधिकारी जयंत चव्हाण यांनी स्वतः कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसून नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. ओळखपत्र आणि कामासंबंधीची कागदपत्रे तपासल्यानंतरच कार्यालयात प्रवेश दिला जात असल्याने दलालांच्या मनमानीला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरटीओ कार्यालयांच्या कामकाजात पारदर्शकता राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार परिवहन आयुक्तांनीही सर्व कार्यालयप्रमुखांना पारदर्शक कारभार करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल आरटीओने प्रवेशद्वारावरच मदत व मार्गदर्शन व्यवस्था सुरू केली आहे. प्रादेशिक अधिकारी जयंत चव्हाण हे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रवेशद्वारावर उपस्थित राहून नागरिकांच्या कामाची माहिती घेतात. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करून संबंधित विभागात पाठवले जाते. यासाठी स्वतंत्र नोंदवहीही ठेवण्यात आली आहे. याठिकाणी दररोज सुमारे दीडशेहून अधिक वाहनधारक कार्यालयात येत असतात. त्यांना आता थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधता येत असल्याने कामकाजात सुलभता येण्यास मदत होत आहे.
दरम्यान, वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. ‘वाहन’ प्रणालीद्वारे वाहनांशी संबंधित 88 पैकी 42 सेवा, तर ‘सारथी’ प्रणालीद्वारे वाहनचालक परवान्यांच्या 27 पैकी 23 सेवा ऑनलाईन मिळतात. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची गरज असलेल्या कामांसाठीच नागरिकांनी भेट द्यावी आणि मध्यस्थांच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत ऑनलाईन सेवांचा वापर करावा, असे आवाहन जयंत चव्हाण यांनी केले आहे.






