| कर्जत/नेरळ | प्रतिनिधी |
प्रस्तावित टोरंट पॉवर जलयुक्त प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणावर, जंगलसंपत्तीवर, जलस्रोतांवर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींवर होणाऱ्या संभाव्य परिणामांविरोधात कर्जतमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, शेतकरी संघटना आणि पर्यावरणप्रेमी संघटना एकवटल्या आहेत. त्यांच्याकडून रविवारी (दि.22) कर्जत येथे सह्याद्री संरक्षण जनजागृती मोहीम आणि कँडल मार्च आयोजित करण्यात आला.
कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून या कँडल मार्चमध्ये पर्यावरणप्रेमींसह असंख्य कर्जतकर सहभागी झाले होते. सायडोंगरातील वृक्षतोडीविरोधात संताप व्यक्त करत पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी एकजूट दाखवली. कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात टोरंट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा कँडल मार्च काढण्यात आला. या मोहिमेला कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघष समिती, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), आजाद समाज पार्टी, शिवसंग्राम तसेच विविध सामाजिक, शेतकरी, पत्रकार, कामगार आणि स्थानिक संघटनांनी पाठिंबा दिला.
मोर्चादरम्यान, निसर्ग, जंगल आणि पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकरांनी शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला. यावेळी कर्जत पर्यावरण बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, टोरंट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून कर्जतकरांचे पाणी हिरावून घेण्याचे काम होणार आहे. तसेच, पाली सायडोंगरातील झाडे तोडून सरकार आपले ऑक्सिजन हिरावून घेत असल्याचे पर्यावरणप्रेमी जाहीरपणे सांगत आहेत. परंतु, सरकार ते पटवून घेत नाही, अशा प्रकारे त्यांनी टीका केली. तसेच, हा प्रकल्प कर्जतला विनाशाकडे नेणारा असून, संपूर्ण देश कर्जतकरांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे कर्जत तालुक्याला आणि सह्याद्री वाचवण्यासाठी आपल्याला अंतापर्यंत लढाई लढावी लागणार आहे, असेही मोरे यांनी सांगितले.







