पनवेलकरांसाठी अरविंद म्हात्रे आक्रमक; 30 एमएलडी पाण्याची मागणी
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेलकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना मोरबे धरणातील पाणी विकासकाला कशासाठी, असा सवाल उपस्थित करत महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मोरबे धरणातून पनवेलसाठी किमान 30 एमएलडी पाणी उपलब्ध करून द्यावे आणि 2018 मध्ये एका विकासकाला दिलेली पाणीपुरवठ्याची परवानगी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. पालकमंत्री भरत गोगावले यांच्या दालनात सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी पाणीप्रश्नाचे 17 मुद्दे मांडले. त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि तीव्र होत चाललेली पाणीटंचाई लक्षात घेऊन म्हात्रे यांनी या बैठकीची मागणी केली होती. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातून पनवेलकरांसाठी 30 एमएलडी पाणी मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी होती. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसताना विकासकाला दिलेली परवानगी कायम ठेवण्याची गरज काय, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
केवळ मोरबे धरणावर अवलंबून न राहता जांभिवली धरण, ओवे कॅम्प धरण, उसरण धरण आणि पोशीर जलप्रकल्प यांचाही पनवेलच्या पाणीपुरवठ्यासाठी वापर करता येऊ शकतो, असे म्हात्रे यांनी निदर्शनास आणले. या जलस्रोतांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, त्यासंबंधीची माहिती बैठकीत सादर केली. या सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन पनवेलकरांसाठी पाणी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गोगावले यांनी दिले.
पनवेलची वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची गरज, नवीन पाणीपुरवठा योजना आणि सध्याच्या टंचाईवरील उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर, आ. विक्रांत पाटील, महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, नगरसेवक हरेश केणी, तुषार पाटील, रामदास शेवाळे, ॲड. प्रथमेश सोमण यांच्यासह जलसंपदा विभाग, सिडको, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







