दुरुस्तीसाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद; 64 हजार नागरिकांची पाण्यासाठी वणवण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट, त्यात आता धरणाच्या मुख्य व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावर अवलंबून असलेल्या 47 गावांतील 64 हजार नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुख्य वॉलच्या दुरुस्तीसाठी सोमवार (दि. 23) पासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
जूनपर्यंत पाणीसाठा पुरावा, यासाठी गेल्या महिन्यापासून उमटे धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित असलेल्या या धरणातून 47 गावे आणि 33 वाड्यांतील सुमारे 64 हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. सुडकोलीपासून 12 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावांची तहान या धरणावर अवलंबून आहे. मागील महिन्यात जलवाहिनीतील बिघाडामुळे दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट कायम असतानाच सोमवारपासून नळांना पाणी येणे बंद झाले. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.
धरणातील मुख्य व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली. पाण्यासाठी नागरिकांना विकतचे पाणी आणावे लागत असून, काही जण जवळच्या विहिरींचा आधार घेत आहेत.
गाळाने भरलेले उमटे धरण सातत्याने चर्चेत असते. दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाण्याचा प्रश्न कायम आहे. मुख्य वॉलमध्ये बिघाड झाल्याने एक ते दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नेमका किती काळ पाणी बंद राहणार, हे स्पष्ट नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पाणी बंदचे पत्रही ऐनवेळी!
उमटे धरणातील मुख्य व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याची माहिती अभियंत्यांना आधीच मिळाली होती. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू केले त्याच दिवशी पाणीपुरवठा बंद करण्याचे पत्र काढण्यात आले. दोन दिवस आधीच नागरिकांना सूचना दिली असती, तर पर्यायी पाण्याची व्यवस्था करता आली असती. अचानक पाणी बंद केल्याने विशेषतः महिलांची पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.







