45 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांवर गंभीर आक्षेप; मुख्यमंत्री सचिवालयाकडून सीईओंना कार्यवाहीचे आदेश
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीच्या नावाखाली वर्षानुवर्षे मलाईदार पदांवर ठाण मांडून बसलेल्या 45 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा मुद्दा आता थेट मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत पोहोचला आहे. प्रतिनियुक्ती रद्द होऊनही कर्मचारी मूळ जागी परतले नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालय कक्षाने (सीएमओ) गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नियमोचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
संजय सावंत यांच्या तक्रारीनुसार, जिल्हा परिषदेतील 45 कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मंत्रालय, कोकण भवन आणि जिल्हा परिषद मुख्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. प्रतिनियुक्ती रद्द होऊनही संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, अभिलेखावरही ‘कार्यमुक्त केले नाही’ अशी नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असताना हे कर्मचारी सोयीच्या आणि महत्त्वाच्या टेबलांवर कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या नियुक्त्यांमागे वरिष्ठ अधिकारी आणि खातेप्रमुखांचे हितसंबंध असल्याचा, तसेच मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोयीच्या जागी ठेवण्यासाठी ‘मंथली’ वसुली आणि टक्केवारीचा व्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कामे रखडत असताना प्रतिनियुक्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित साखळीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दोषी खातेप्रमुखांना तात्काळ निलंबित करावे, 24 तासांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी पाठवावे, तसेच त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करावी, अशा मागण्या सावंत यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाने तक्रारीची दखल घेत सीईओंना कार्यवाहीचे निर्देश दिल्याने आता जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि या आरोपांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






