घातक पदार्थ थेट नदीच्या पाण्यात; प्रभावी व्यवस्था उभारण्याची गरज
। महाड । प्रतिनिधी ।
मागील शंभर वर्षात प्रथमच संपूर्ण राज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाची चिन्हे दिसू लागत असतानाच महाड तालुक्यातील सावित्री काळ गांधारी या नदीपात्रावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना नदीकिनारी होणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्याने नव्या समस्येला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचेच या निमित्ताने केलेल्या पाहणी मध्ये स्पष्टपणे दिसून आले.
यासंदर्भात तालुक्याच्या विविध भागात केलेल्या प्रत्यक्ष पाहणी वेळी असे निदर्शनास आले की यासंदर्भात महाड नगर परिषदेचा असलेला लाडवली येथील घनकचरा प्रकल्प सोडल्यास तालुक्यात अन्यत्र कोठेही घनकचरा प्रकल्प अस्तित्वात नसल्याने या कचऱ्याची विल्हेवाट संबंधित ग्रामपंचायतीमधील यंत्रणांकडून नदीकिनारी टाकली जात असल्याचे स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे.
नद्यांचे किनारे स्वच्छ राहिल्यास या परिसरात कृषीपूरक व्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. मात्र, सद्यस्थितीमध्ये महाड तालुक्याच्या विविध गावातील नदी किनारे हे भीषण कचऱ्याच्या प्रदूषणामध्ये अडकल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी काळात दुष्काळा बरोबरच या नवीन संकटावर मात करण्यासाठी शासनाला वेळीच प्रत्येक पंचायत विभागामध्ये घनकचरा प्रकल्प निर्माण करण्याकरता धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल असे मत या क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.
महाड तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री, काळ आणि गांधारी या प्रमुख नद्यांचे किनारे परिसरातील गावांमधून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. नदीकिनारी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून, त्यातील प्लास्टिक, रासायनिक कचरा आणि अन्य घातक पदार्थ थेट नदीच्या पाण्यात मिसळत आहेत. त्यामुळे नदी प्रदूषणात केवळ औद्योगिक क्षेत्रच नव्हे, तर शहर आणि परिसरातील गावांचाही मोठा वाटा असल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कचरा संकलन, वर्गीकरण, विघटन आणि शास्त्रोक्त विल्हेवाट यासाठी प्रभावी व्यवस्था उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील सावित्री, काळ आणि गांधारी या तिन्ही नद्या महाड शहर आणि औद्योगिक परिसरातून वाहत आहेत. भारतीय संस्कृतीत नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून अनेक ठिकाणी त्यांची देवीच्या रूपात पूजा केली जाते. मात्र, याच नद्यांची मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत आहे. नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने औद्योगिक कंपन्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळेही नद्यांचे प्रदूषण वाढले आहे.
अस्वच्छतेचा त्रास
महाड औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या काळ आणि सावित्री नद्यांनाही या प्रदूषणाची झळ बसली आहे. औद्योगिक क्षेत्रातील गावांचा विकास होत असताना मूलभूत कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था मात्र प्रभावीपणे कार्यान्वित नसल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वछतेचा त्रास सहन करावा लागत आहे.






