जुरेलने पार पाडली संकटमोचकाची भूमिका; महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला
| क्राइस्टचर्च | वृत्तसंस्था |
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल मैदानावर सुरू आहे. पहिल्या डावात भारतीय संघ 116 धावांत 6 गडी बाद झाल्यामुळे कठीण परिस्थितीत सापडला होता. अशा वेळी यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने जबाबदारी स्वीकारली आणि तळाच्या फलंदाजांसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला. आणि संघावरील फॉलोऑनचे संकट दूर केले. त्याने भारताची धावसंख्या 246 पर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात गडी गमावल्याने भारतीय संघ 7 बाद 117 असा आणखी अडचणीत सापडला. मात्र, यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने पुन्हा एकदा संकटमोचकाची भूमिका पार पडली. त्याने तळाचे गोलंदाज आकाश दीप व गुरनूर ब्रार यांना सोबत घेताना न्यूझीलंडच्या 356 धावांचा पाठलाग करताना फॉलोऑन टाळला. आकाशसह त्याने आठव्या बळीसाठी 74 चेंडूंत 46 धावांची भागीदारी केली. ही या सामन्यातील भारतासाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. मात्र, या भागीदारीत आकाशचा (29) खूप मोठा वाटा होता. दरम्यान, कायले जेमिन्सनचे दोन बाऊन्सर हेल्मेटवर आदळूनही आकाश मैदानावर उभा राहिला. त्यानंतर आलेल्या गुरनूरला सोबत घेऊन ध्रुवने संघाला दोनशेपार पोहोचवले. ध्रुवने 100 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि लंच ब्रेकपर्यंत त्याने संघाची धावसंख्या 8 बाद 206 धावांपर्यंत पोहोचवली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने 90 धावा जोडून दोन गडी गमावले. दुसऱ्या सत्रातील पहिलाच चेंडू गुरनूरच्या मानेवर जोरार आदळला आणि वातावरणात अचानक गंभीर स्वरूप आले. गुरनूर त्यानंतरही मैदानावर उभा राहिला आणि त्याने ध्रुवसोबत नवव्या बळीसाठी 124 चेंडूंत 64 धावांची भागीदारी करताना 10 धावांचे योगदान दिले. मात्र, जेमिन्सनचा इनस्विंग चेंडू सोडण्याचा फटका गुरनूरला बसला आणि त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर जुरेल 170 चेंडूंत 88 धावांवर बाद झाल्याने भारताचा डाव 246 धावांवर गडगडला. यावेळी न्युझिलंडचा गोलंदाज कायले जेमिन्ससने 4 बळी घेतले. तर मॅट हेन्री, नॅथम स्मिथ व जेकब डफी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
त्यानंतर पुन्हा फलंदाजी करायला आलेल्या न्युझालंड संघाला जसप्रीत बुमराहने अडचणीत आणले. त्याला 292 चेंडूंनंतर सूर गवसला आणि टॉम लॅथमला (8) माघारी पाठवत पहिला बळी मिळवला. त्यानंतर हेन्री निकोल्सचा (22) अप्रतिम रिटर्न कॅच घेऊन किवींना 63 धावांत दोन धक्के दिले. डेव्हॉन कॉनवे व रचिन रवींद्र या जोडीने जम बसवला होता; परंतु, यशस्वीच्या अविश्वसनीय झेलने भारताला मोठा बळी मिळवून दिला. 51 धावांची खेळी करणारा कॉनवे वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र, दिवसअखेर रचिन रवींद्र (नाबाद 46) आणि डॅरिल मिचेल (नाबाद 5) हे मैदानावर होते. यावेळी 40 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडला 3 बाद 133 धावांपर्यंत पोहोचवले आणि त्यांनी 246 धावांची आघाडी घेतली आहे.
जुरेलचा खास क्लबमध्ये प्रवेश
या सामन्यात धु्रव जुरेल (88) परदेशात आपले पहिले कसोटी शतक पूर्ण करण्यापासून थोडक्यात हुकला. शतकापासून तो केवळ 12 धावा दूर होता. तरीही, या खेळीमुळे त्याने एमएस धोनी आणि किरण मोरे यांच्यासोबत एका विशेष विक्रमी यादीत आपले नाव नोंदवले आहे. वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत जुरेलने 78 धावा केल्या होत्या, तर क्राइस्टचर्च कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 88 धावांची खेळी केली. यासह, न्यूझीलंडच्या भूमीवर सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन किंवा अधिक अर्धशतके झळकावणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी, एमएस धोनीने तीन वेळा आणि किरण मोरे यांनी दोन वेळा ही कामगिरी केली होती.







