पाणीटंचाईपासून बांधकामांपर्यंत अनेक गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात मुरुडमधील नागरिकांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे. नागरिकांना अपमानास्पद वागणूक, माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि बांधकामांमधील कथित अनियमितता अशा अनेक मुद्द्यांवर गंभीर आरोप करीत मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराची शासनस्तरावर सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी थेट मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावले आहेत.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मुख्याधिकारी सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना भेटीसाठी तीन ते चार तास ताटकळत ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भेट मिळाल्यानंतरही समाधानकारक उत्तरे न देता अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यास उत्तर दिले जात नाही किंवा चुकीची माहिती दिली जाते, असा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत जाब विचारल्यास, ‘तुम्ही अपील करा, तुम्हाला तीन-चार वर्षे कोकण भवनला फेऱ्या मारायला लावीन,’ अशी धमकीवजा उत्तरे दिली जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
मुरुड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खारआंबोली धरणात मुबलक पाणीसाठा आणि पुरेशी क्षमता असतानाही शहराला कमी दाबाने केवळ सव्वा तास पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर मोकाट बैल, कुत्रे आणि घोड्यांचा शहरातील वावर वाढला असून रस्त्यांवर अस्वच्छता पसरत आहे. याचा शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा फटका बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगरपरिषदेच्या बांधकामविषयक धोरणावरही नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. सामान्य नागरिकांची सीआरझेड क्षेत्रातील बांधकामे जमीनदोस्त केली जात असताना दरबार रोडवरील 15 ते 20 वर्षे जुन्या आणि नगरपरिषदेनेच पाडण्याची नोटीस दिलेल्या जीर्ण इमारतीला पुन्हा बांधकामाची परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सामान्यांसाठी वेगळा आणि इतरांसाठी वेगळा न्याय असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी शासनाने बोटिंग क्लब, मिनी मार्केट आणि अपार्टमेंट हॉटेल या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी दिला होता. मात्र, निकृष्ट दर्जाच्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे मिनी मार्केट व अपार्टमेंट हॉटेलच्या इमारती नगरपरिषदेला पाडाव्या लागल्याचा आरोप निवेदनात आहे. दरम्यान, ‘दर्यासागर’ बोटिंग क्लबच्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी नगरपरिषदेला शासनाकडे 49 हजार 590 रुपयांचा दंड भरावा लागल्याची बाबही समोर आणण्यात आली आहे. अपार्टमेंट हॉटेलची इमारत पाडल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा नवीन बांधकाम सुरू करण्याच्या हालचालींमुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या आरोपांच्या समर्थनार्थ नगरपरिषदेने भरलेल्या दंडाच्या पावतीची प्रतही निवेदनासोबत जोडण्यात आली आहे. उदय चौलकर, महेश मानकर, स्वप्नील कवळे, जाहीद फकजी, विजय भगत, प्रभाकर मसाल, अविनाश भगत आणि संजय डांगे यांच्यासह अनेक नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दरम्यान, या सर्व आरोपांबाबत मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. आता मुख्यमंत्री या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देतात का आणि मुरुडकरांच्या समस्यांना न्याय मिळतो का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.






