रत्नागिरी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला समुद्रापासून तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा सुळका नाचणे-सुपलवाडी येथील दिव्या संजय भोरे हिने सर केला असून, हे यश मिळवणारी रत्नागिरीच्या गृहरक्षक दलातील पहिली महिला जवान ठरली आहे.
दिव्याची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामध्ये वडिलांचे छत्र हरपलेले. असे असताना मोठ्या जिद्दीने स्वतःसमोर ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी नेहमी ती प्रयत्नात असते. दिव्या म्हणाली की, पहाटे 4 वाजता या मोहिमेची सुरुवात मोहारी गावापासून झाली. प्रचंड प्रमाणात थंडी पडलेली, सगळीकडे अंधार पसरलेला असताना चंद्राच्या प्रकाशात वाट चालत होते. 4 वाजून 20 मिनिटांनी रायलिंग वठारावरती पोहचले आणि तेथून खर्या अर्थाने गिर्यारोहणाची परीक्षा सुरू झाली. गिर्यारोहणाचे साहित्य अंगामध्ये घालून 6 वाजून 10 मिनिटांनी चढाईला सुरुवात केली.
चढाई करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. सोसाट्याचा वारा झेलत अतिप्रमाणात थंडी सहन करत चढाई करताना संपूर्ण कस लागला. अशा प्रकारे सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी लिंगाणाच्या शिखरावरती पोहचले. भारत माता की जय, अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत मातृभूमीचा देशाचा तिरंगा फडकवण्याचा मान मला मिळाला. ज्येष्ठ गिर्यारोहक (कै.) मोहन खातू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या माऊंटेनिअर्स असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली. पुणे, हडपसर येथील जय हिंद ट्रेकर्सचे आयोजक गौरव भोकरे व निशांत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.