4 हजार वैयक्तिक हरकती कार्यालयात दाखल
। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रासाठी 32 गावे (रायगड जिल्ह्याच्या पनवेल तहसीलची 7 गावे आणि उरण तहसीलची 25 गावे) विकसित करण्यासाठी सिडकोने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नैना प्राधिकरनाची नेमणूक केली आहे. त्यानुसार सर्वसमावेशक व उत्तम दर्जाची सोयी-सुविधांनी परिपूर्ण विकास करण्यासाठी खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रातील 32 गावाचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा सिडकोच्या नैना प्राधिकरणाने जाहीर केला आहे. मात्र त्यास उरण मधील सर्व शेतकर्यांचा, ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.
याचाच एक भाग म्हणून सुमारे 4 हजार वैयक्तिक हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी दोन ते तीन हजार हरकती दाखल झालेल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत याबाबत विरोध करून तसे ठरावही घेण्यात आले आहेत. प्रत्येक गावात, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती सुरु आहे.
कोप्रोली सरपंच अलका म्हात्रे, उपसरपंच विपूल म्हात्रे, आवरेे सरपंच निराबाई पाटील, सरपंच केळवणे संदिप घरत, सामाजिक कार्यकर्ते रूपेश पाटील, गुरूनाथ गावंड, विश्वनाथ म्हात्रे, अनिल म्हात्रे, चंद्रशेखर ठाकूर, रोशन पाटील, प्रकाश पाटील, कुलदीप नाईक, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, पंकज ठाकूर आदींनी प्रांजली केणे सिडको मुख्य नियोजनकार (नैना) बेलापूर, नवी मुंबई यांच्या कार्यालयात जाऊन खोपटे नवनगर प्रकल्पास विरोध म्हणून सुमारे चार हजार वैयक्तिक हरकती दाखल केल्या आहेत.







