। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विभागीय चौकशीमध्ये तक्रारदार याच्या बाजूने अहवाल पाठविण्यासाठी मागितलेल्या पंधरा हजार लाचेप्रकरणी रोहा पंचायत समितीचा सहाय्यक गटविकास अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. अलिबाग रायगड लाच लुचपत पथकाने सहाय्यक गट विकास अधिकारी पंडित कौरु राठोड यास दहा हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे रोहा पंचायत समितीमधील अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. पंडित राठोड हे रोहा पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. पंडित याच्याकडे तळ्याचा अतिरिक्त कार्यभार ही होता. तक्रारदार याच्या विरोधात कोकण भवन येथे एका प्रकरणाबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. तक्रारदार याच्या प्रकरणात आरोपी पंडित हे चौकशी अहवाल सादर अधिकारी म्हणून नेमलेले होते.
तक्रारदार याच्या प्रकरणातील अहवाल आरोपी यांना तयार करून कोकण भवन येथे पाठवायचा होता. आरोपी पंडित यांनी तक्रारदार याच्या बाजूने अहवाल पाठविण्यासाठी 15 हजाराची लाच तक्रारदार याच्याकडे मागितली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रारदार यांनी पाच हजार पंडित यांना दिले होते. उर्वरित दहा हजार रुपयांची मागणी पंडित यांनी तक्रारदार याच्याकडे केली. तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग येथे 24 मार्च रोजी लाचलुचपत कार्यालयात येऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार आज 25 मार्च रोजी लाचलुचपत पथकाने रोहा पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला.