तीन उन्नत मार्गाची उभारणी; विमानतळ प्रकल्पाशीही रस्ते जोडणार
। पनवेल । वार्ताहर ।
राज्यातील सर्वाधिक म्हणजे 13 विविध राष्ट्रीय व राज्य महामार्ग आणि सेवारस्त्यांशी जोडल्या गेलेल्या कळंबोली सर्कलवर नेहमीच होणारी वाहतूक कोंडीची समस्या काही वर्षांत दूर होणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत या ठिकाणी तीन उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशमार्गाशी जोडणारा मार्ग उभारण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या सर्व कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खर्च करणार आहे.
उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरातून दिवसाला शेकडो कंटेनर पुणे, मुंबईसह, भिवंडी व राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये येजा करतात. कंटेनरच्या प्रवासामधील अडथळा दूर करण्यासाठी कळंबोली सर्कलवरील वाहतूक कोंडी सोडविणे हे मोठे जिकरीचे झाले होते. मात्र, या ठिकाणी एकत्र येणारे विविध मार्ग वेगवेगळया सरकारी यंत्रणांच्या अखत्यारीत येत असल्याने याबाबतचे नियोजन होणे कठीण बनले होते.
शीव पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे तर यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. द्रुतगती महामार्गाच्या खालून उरण येथे जाणारा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरम्णाच्या ताब्यात आहे. मुंब्रा पनवेल महामार्ग हा पुणे येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाच्या देखरेखीखाली आहे. तर येथील सेवा रस्ते सिडको मंडळ आणि जवाहर औद्योगिक को- ऑप. सोसायटीच्या देखरेखीखाली येतो. वेगवेगळया यंत्रणांमध्ये समन्वय होत नसल्यामुळे याठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीला कोणीही वाली उरला नव्हता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन सर्व यंत्रणांची नुकतीच बैठक घेतली.
नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीत गडकरी यांनी उरण व पनवेलमध्ये येणार्या प्रकल्पांची माहिती घेऊन आगामी 30 वर्षांच्या वाहतुकीच्या ताणाबाबत प्रस्ताव बनवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी कळंबोली सर्कल येथे आणखी तीन उन्नत मार्ग उभारण्याचा तसेच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी भक्कम व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव तयार केला.
या प्रस्तावानुसार, पनवेल शहर आणि खांदेश्वर वसाहतींमधून निघणार्या वाहनांना शीव-पनवेल मार्ग गाठण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपुलाची मार्गिका उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंब्रा-पनवेल महामार्गावरून ये-जा करणारी वाहने न थांबता जेएनपीटी महामार्गाकडे रवाना होणार आहेत. या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी येणार आहेत. उलवे येथून प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्वेचे प्रवेशव्दार ते विविध मार्ग जोडणी प्रकल्पाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प 400 कोटी रुपयांचा आहे. पळस्पे ते कळंबोली व जेएनपीटी ते नवी मुंबई आम्रमार्ग हे दोनही महामार्गाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे.