कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे यांची संकल्पना
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
सोशल मिडीयाच्या आहारी जाणार्यांना गंडा घालणारी टोळी सक्रीय झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून कोकणातील पाचही जिल्ह्यात सोशल मिडीया लॅब (समाज माध्यम नियंत्र कक्ष) उभारले जाणार आहे. मुंबई स्पेशल ब्रांचच्या धर्तीवर अभिनव उपक्रम राबविणार असून त्याठिकाणी अद्यायावत अशा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून निधीची तरतूद केली जाणार आहे. या उपक्रमातून सोशल मिडीयाद्वारे होणारे गुन्हे रोखण्यास मदत होणार आहे.
फेसबुक आणि व्हॉट्स अॅपबरोबरच इंस्ट्राग्राम व इतर सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी सोशल मिडीयाच्या प्रचंड आहारी जाऊ लागली आहेत. सोशल मिडीयातील वेगवेगळे व्हिडीओ व स्कीम बघण्यामध्ये तरुणाई प्रचंड वेळ वाया घालवत आहे. सोशल मिडीयाद्वारे मेसेज पाठवून अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सोशल मिडीयाद्वारे अनेकांना आर्थिक गंडादेखील घातला जातो. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच या गुन्हयांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यात सोशल मिडीया लॅब उभारली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांना सुचना केल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आला आहे.
सुसज्ज अशा सोशल मिडीया लॅबमध्ये संगणक, सॉफ्टवेअरची सुविधा असणार आहे. संगणक, तांत्रिक शिक्षण घेणारे व इंजिनिअर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. त्यांना महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी व राष्ट्रीय पोलीस अॅकडेमी मार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोशल मिडीयाचा गैरवापर करून फसवणूक करणार्यांबरोबरच सोशल मिडीयाचा गैरवापर करण्यांवर या लॅबद्वारे लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे. रायगडसह कोकणातील पोलीस दलामध्ये सोशल मिडीया लॅब लवकरच कार्यान्वीत केली जाणार असल्याची माहिती संजय दराडे यांनी दिली.
डिजीटल अरेस्टचा प्रकार शंभर टक्के खोटा
बॅँक खात्यातून अनेक बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाले आहेत. तपास सुरू असलेल्या व्यक्तींच्या गैरव्यवहार सामील आहात. त्याचा व्हीडीओ उपलब्ध आहे. असे सांगून पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी यांचे बनावट ओळखपत्र पाठवून घाबरवण्याचा प्रकार काही मंडळी करतात. प्रत्यक्ष अटक न करता, डिजीटल अरेस्ट करीत असल्याची धमकी देतात. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची लुट केली जाते. परंतु हा डिजीटल अरेस्टचा प्रकार शंभर टक्के खोटा आहे. असे कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितले आहे. कोणीही याच्या आहारी जाऊ नये आवाहनदेखील त्यांनी केले.
सागरी सुरक्षेसाठी पावले उचलणार
रायगडसह कोकण पर्यटनाचा भाग आहे. पर्यटन हा महत्वाचा भाग आहे. पर्यटनामुळे विकास वाढणार आहे. परंतु काही मंडळी याच पर्यटनाचा अधार घेत अंमली पदार्थ तस्करी, व इतर गैरप्रकार करतात. त्यांच्याविरोधात कारवाई सुरु आहे. सागरी सुरक्षेसाठी कडक कारवाई केली जाणार आहे. सागरी सुरक्षेसाठी अधिक कडक पावले उचलली जाणार असल्याचे दरडे म्हणाले.