| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
हरिहरेश्वर येथे मंदिराच्या मागील बाजूस समुद्राच्या लगत असलेल्या प्रदक्षिणा मार्गांवर फोटो काढत असताना महिला पर्यटक लाटाच्या जोरदार फटक्या मुळे समुद्रात पडली. समुद्रात पडलेल्या महिला पर्यटकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या पर्यटकांने पाण्यात उडी घेतली. महिला पर्यटकास वाचविण्यात तालुका प्रशासनास यश आले मात्र पुरुष पर्यटकास त्याच्या प्राणास मुकावे लागले. प्राप्त माहितीनुसार तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे पुणे येथील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. पांडव प्रदक्षिणा मार्गावर फिरत असताना महिला पर्यटक मनीषा जयेश मेटे -दळे वय ४९ राहणार औंध समुद्राच्या लगत असलेल्या खडका वर फोटो काढत असताना जोरदार पाण्याची लाट आली. लाटे सोबत मनीषा समुद्रात खेचल्या गेल्या मनीषा समुद्रात पडल्याचे दिसताक्षणी विकास रामचंद्र काळे वय ५४ राहणार हडपसर यांनी त्यांना वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतली. पाण्याच्या खोलीचा विकास काळे यांना अंदाज आला नाही.
पर्यटक समुद्रात पडल्याचे वृत्त समजल्या क्षणी हरिहरेश्वर चे सरपंच अमित खोत यांनी प्रांत अधिकारी अमित शेडगे व तहसीलदार सचिन गोसावी यांना सदर वृत्त कळवून मदतीची मागणी केली. प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी स्थानिक मच्छीमार शोएब हमदुल्ले व अरमान राऊत आरावी यांना मदतीसाठी विनंती केली. शोएब हमदुल्ले व अरमान यांनी हरिहरेश्वर येथे तात्काळ धाव घेतली. शनिवारी समुद्रातील पाण्याला जोरदार करंट होता. त्यामुळे कुणीही समुद्राच्या पाण्यात उतरण्यास तयार नव्हते. मात्र महापुराच्या प्रसंगी धावून जाणार्या शोएब हमदुल्ले यांनी धाडस दाखवत समुद्रात झेप घेतली . पाण्याला जोरदार करंट असल्यामुळे विकास रामचंद्र काळे यांना वाचण्यात यश मिळाले नाही. मात्र मनीषा जयेश मेटे यांना वाचविण्यात यश मिळाले.
पर्यटकांना समुद्राच्या किनार्यावर लाटांच्या समवेत फोटो काढण्याचा मोह न आवरल्या मुळे जीव गमावावा लागलेला आहे रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील निवडक व्यक्तींना आपत्ती प्रशिक्षणासाठी ओडिसा येथे पाठवण्यात आले होते ओडिसा येथे पाठवण्यात आलेल्या टीम मध्ये हरिहरेश्वर चे सरपंच अमित खोत यांचा समावेश होता. अमित खोत यांनी दाखवलेला तत्परतेमुळे निश्चितच एका पर्यटकाचा जीव वाचला आहे. तसेच पाण्याला प्रचंड करंट असताना जीवाची पर्वा न करता पर्यटकाला वाचवणाऱ्या शोएब हमदुल्ले व अरमान राऊत यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
हरिहरेश्वर येथील समुद्रात बुडणाऱ्या एक पर्यटकास वाचविण्यात यश आले मात्र दुसऱ्या पर्यटकाचे दुःखद निधन झाले आहे . पर्यटक पाण्यात पडल्याचे वृत्त समजताच स्थानिक मच्छीमार व तटरक्षक दल यांना कळवले . शोहेब व अरमान या दोन्ही स्थानिक मच्छीमारानी समयसूचकता दाखवून पर्यटकाचे जीव वाचवले आहे.
– प्रांताधिकारी अमित शेडगे