50 वर्षांपूर्वीची पाणीयोजना कागदावरच
। मुरूड । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील यशवंतनगर पंचक्रोशीत एकूण सहा ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यातील सुमारे पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येला स्वतःची हक्काची अशी पाणीपुरवठा योजना नसल्याने ऐन उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या कठीण काळात त्यांना पाण्यासाठी दाही दिशा भटकणे भाग पडत आहे. नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील नारळ-सुपारीच्या बागांतील विहिरी, विहूर ग्रामपंचायत हद्दीतील एक पाझर तलाव, अन्य गावांतील ग्रामस्थांच्या परसदारच्या विहिरी तसेच गावोगावच्या पारंपरिक विहिरी व पाणवठे सोडल्यास येथील सर्व ग्रामपंचायतींची आजतागायत जिल्हा परिषदेच्या व शासनाच्या अन्य तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना राबवून जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठीची तारेवरची कसरत सुरुच आहे.
विशेष म्हणजे, या सर्व पाणी योजनांद्वारे जनतेला पुरवठा करण्यात येणार्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणतीही यंत्रणा येथे नसल्याने हा सर्व पाणीपुरवठा अशुद्ध स्वरुपाचा असल्याचे माहीत असूनही जनतेला दुर्दैवाने त्यातही धन्यता मानावी लागत आहे. बॅ. अंतुले साहेबांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून प्रथम समावेश होताच त्यांनी पंचक्रोशीतील जनतेसाठी नांदगाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबवली. येथील ग्रामपंचायतींनी योजनेच्या दहा टक्के लोकवर्गणीही भरली. गावोगावी जलवाहिन्या, पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या. वडघर कसाब येथील नदीवर धरणाकरिता बांधण्यात येणार्या बंधार्यास कंत्राटदाराने माती घेण्याच्या कामास वनखात्याच्या अधिकार्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. गेल्या पन्नास वर्षांपासून ही योजना रखडली ती कायमची.
दरम्यान, माजगाव ग्रामपंचायत हद्दीतील खोकरी येथील बारमाही जिवंत स्त्रोतांच्या पाण्याला आडवून तेथे धरण बांधल्यास येथील नैसर्गिक पाणी पंचक्रोशितील नागरिकांना पुरवता येऊ शकते, असे येथील काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर, खारआंबोली येथील धरणाचे पाणी जवळपास पंधरा ते वीस कि.मी. अंतराची जलवाहिनी टाकून पंचक्रोशितील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा, असे येथील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे खासदार, पालकमंत्री, आमदारांनाही साकडे घातले आहे. मे महिन्याच्या कठीण काळातील परिस्थिती दरवर्षी ङ्गजैसे थीफ तशीच आहे. त्यामुळे येथील जनता पारंपरिक विहिरीतून लोटा लोटा भरुन पाणी गोळा करुन हंडे कळशी भरत आहेत आणि पावसाने लवकर पडावे म्हणून याचना करत आहेत