। श्रीवर्धन । वार्ताहर ।
सेवानिवृत्तांची संघटना, श्रीवर्धन शाखेची 2021-22 ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 21 जून रोजी श्रीवर्धन येथील माळी समाज हॉल येथे अध्यक्षा रोहिणी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सभेसाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष धुरंधर मढवी, अंतर्गत लेखा परीक्षक गिरकर व सहकारी मुद्दाम अलिबाग-पेणहून आले होते. सभेमध्ये दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली, मागील इतिवृत्त मंजुरी, वार्षिक अहवाल वाचन, जमाखर्च वाचन व मंजुरी, 2022-23 च्या अंदाजपत्रकास मंजुरी, वयाची सत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार इ. विषयांबरोबरच 2022 ते 2025 या तीन वर्षांकरिता नवीन कार्यकारिणी निवड करणे हा महत्त्वाचा विषयही होता.
दरम्यान, गेली सुमारे अठरा वर्षे संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळलेल्या विद्यमान अध्यक्षा रोहिणी क्षीरसागर यांनीच पुढील तीन वर्षांकरिता अध्यक्षपद सांभाळावे, अशी सूचना अनघा चौगुले यांनी मांडली आणि त्यास नरेश पुलेकर, कृष्णकांत साखळे यांनी अनुमोदन दिले.सभेत मढवी, वावेकर यांनीही मार्गदर्शन केले. सभासदांच्या मनातील सर्व संभाव्य प्रश्नंची समाधानकारक उत्तरे देऊन मढवी यांनी सदस्यांचे समाधानकारक केले. या सभेचे सूत्रसंचालन आनंद जोशी यांनी केले.