। पोलादपूर । शैलेश पालकर ।
महाड-भोर मार्गावरील वरंध घाटातील वाघजाई मंदिराजवळील दरड बुधवारी कोसळल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातही गुरूवारी सायंकाळी लालमातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन कोसळला. त्यामुळे एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. एल अॅन्ड टी या ठेकेदार कंपनीने दिवसभर सपशेल दूर्लक्ष केल्याने उशिरापर्यंत हा लाल मातीच्या दरडीचा ढिगारा एका मार्गिकेवर तसाच पडून राहिला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटाच्या सुरूवातीला चोळई गावापासूनच एका बाजूला डोंगर कापून काँक्रीटीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर गेल्या चार वर्षांपासून अनेकवेळा डोंगरातून लाल मातीचे कडे कोसळून दरडी पडल्याने वाहतुक ठप्प झाली होती. गुरूवारी दुपारनंतर चोळई येथे दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर रस्त्यालगतच्या संरक्षक कठडयावरून हा ढिगारा काँक्रीटच्या रस्त्यावर आल्याचे दिसून आले. यावेळी ठेकेदार कंपनीने पावसाची रिपरिप सुरू असल्याकारणाने तातडीने दरडीचा ढिगारा हटविण्याचे टाळले. यामुळे चारपदरी राष्ट्रीय महामार्गापैकी दोन पदरी रस्ता या दरडीमुळे बंद झाला.
पोलादपूर ते कशेडी टॅपपर्यंतच्या कशेडी घाटामध्ये चोळई गावठाण, चोळई महाविद्यालय, चोळई ते अन्नपूर्णा हॉटेलचा समोरील डोंगरभाग, धामणदिवी, भोगाव, येलंगेवाडी, दत्तवाडी अशा भागात लालमातीचे डोंगर उभे कापल्याने पावसाचे पाणी या डोंगरावर पडून लालमातीचे ढिगारे कोसळण्याच्या घटना वारंवार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील वाहनांचा प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागणार आहे.