| पनवेल । वार्ताहर ।
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या आमदारांचा स्थानिक विकास निधीमधून रत्नागिरी जिल्ह्यातील 243 माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पार पडला. यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आ. शेखर निकम, माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत, मिलिंद किर, कुमार शेटे,अविनाश लाड, जयंत खताते, मिलिंद कापडी,पुजा निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. बाळाराम पाटील यांनी कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाची व्याप्ती खूप मोठी असून पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असून कोकण शिक्षक मतदारसंघातील शाळा आणि शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणेकरिता कटिबद्ध आहे असे सांगितले. विधिमंडळात शाळा आणि शिक्षक यांचे प्रश्नाकरिता नेहमी आवाज उठविला असल्याचे सांंगितले. शाळांच्या समस्या सुटण्याकरिता आमदार निधी कमी पडला म्हणून खासदार निधी तसेच इतर आमदारांचा निधी वापरून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा व शिक्षक यांचे प्रश्नांचा निपटारा करणेकरीता अधिकाधिक निधी देणेबाबत माझा मानस आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.