महापालिकेकडून नवीन जलस्रोतांचा शोध; वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन नियोज
| नवी मुंबई | वार्ताहर |
सिडकोने महामुंबई व नैना क्षेत्रासाठी भविष्यात लागणार्या पाण्यासाठी कोंढाणे, बाळगंगा, हेटवणे (अतिरिक्त) या धरणांचे पर्याय उपलब्ध केलेले असताना, नवी मुंबई पालिकेने नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. बेलापूरपासून 95 किलोमीटर लांब असलेल्या कोलाडच्या किनारावरील अंबा व कुंडलिका नदीतील जलविद्युत प्रकल्पातील विसर्गाचे पाणी नवी मुंबईपर्यंत आणण्याची तयारी सुरू केली आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या सध्या 17 लाख 60 हजार असून, 2038 पर्यंत ती 42 लाखांच्या घरात जाणार आहे. त्यासाठी हा नवीन पाण्याचा आराखडा तयार केला जात आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मोरबे धरणातील 450 दशलक्ष लीटर पाणी दररोज पुरवठा केला जात आहे. या पाण्याव्यतिरिक्त एमआयडीसी नागरी क्षेत्रासाठी पालिका बारवी धरणातील 45 दशलक्ष लीटर पाणी विकत घेत आहे. हे पाणी कमी-जास्त केले जात असून, उन्हाळ्यात या क्षेत्रातील नागरी वसाहतीला पाण्याचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी आहेत.
नवी मुंबई पालिका सध्या 450 दशलक्ष लिटर पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करीत असून, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी आणखी 400 दशलक्ष लिटर पाणी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेने ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाणीस्रोतांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रायगडमध्ये पाणीस्रोताची जास्त उपलब्धता असल्याने जलसंपदा विभागाने सहा धरणांची उभारणी यापूर्वीच केला आहे. मोरबे धरणाच्या परिसराला पाणी साठवणाची मर्यादा असल्याने हे धरण 450 दशलक्ष लीटरपेक्षा जास्त दैनंदिन साठवण करू शकणार नाही, असा अहवाल आहे. माथेरानच्या डोंगर कपारीतून धावरी नदीवाटे येणार्या पाण्याला मर्यादा आहेत. मोरबे धरणाची उंची वाढवूनदेखीलही साठवण पूर्ण होणार नाही. त्यामुळे पालिकेने नवीन पाण्याचा शोध घेताना थेट बेलापूरपासून 95 किलोमीटर लांब असलेल्या कुंडलिका व अंबा नदीच्या पात्रामधील पाण्यावर दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी रायगड जलसंपदा विभाग कोलाड यांना या पाण्याची उचल करता येईल का, याची चाचपणी करण्याची विनंती केली आहे.
कुंडलिकामधून 994 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची तयारी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात 1927 मध्ये टाटा पॉवर कंपनीने हा भिरा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पातून पाहिल्यांदा 300 मेगावॉट वीज निर्माण केली जात होती. टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात आलेली आहे. विद्युत निर्मितीनंतर पाण्याचा विसर्ग हा कुंडलिका व अंबा नदीच्या पात्रात सोडला जात आहे. या पाण्याचा उपसा करून ते नवी मुंबईपर्यंत आणण्याची पालिकेची योजना आहे. कुंडलिका नदीतील पाणी जलसंपदाच्या एका अहवालानुसार 2,287 दशलक्ष घनमीटर इतके आहे. त्यातील 994 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची तयारी पालिका करीत आहे. हे पाणी नवी मुंबईपर्यंत आणले गेल्यास नवी मुंबई पाण्याबाबत पुन्हा एकदा स्वयंपूर्ण होणार आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्या प्रमाणात या शहराला पाण्याची नितांत गरज भासणार आहे. पालिकेच्या मोरबे धरणाला मर्यादा असल्याने इतर स्त्रोत्र शोधले जात आहेत. त्यापैकी अंबा व कुंडलिका नदीतील विर्सग पाण्याचा विचार केला जात आहे. नवी मुंबईतील भविष्यात कमीत कमी 850 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. त्याचा जल आराखडा तयार केला जात आहे. त्यातील हा एक पर्याय आहे.
अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका