अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई-पुणे एक्स्प्रेसजवळील माडप बोगद्याजवळ कार आणि ट्रकला मंगळवारी (दि.6) मध्यरात्री अडीचच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, कारचालक अंकुश राजाराम जंगम (32, रा. सातारा) याच्यासह एकूण दहा जण जखमी आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (24) व गणेश बाळू कोंढाळकर (22) अशी मृतांची नावे आहेत.
कोंढाळकर कुटुंबीय मुळचे सातारा जिल्ह्यातील वाई परिसरातील कोंढावळे गावचे रहिवासी आहे. सोवसारी रात्री ते राहत्या घरापासून मुंबईतील कोपरखैरणे येथे जाण्यासाठी इको कारने निघाले होते. या कारमध्ये 10 ते 12 जण प्रवास करत होते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार माडप बोगद्याजवळ आली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक टायर पंक्चर झालेला ट्रक (केए 56-2799) उभा होता. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालक अंकुश जंगम याचे वाहनावरील नियंत्रण सुटून त्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील लक्ष्मी कोंढाळकर व गणेश कोंढाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारमधील इतर दहा जण जखमी झाले असून, त्यातील पाच ते सहाजण गंभीर जखमी आहे. सर्व जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात घडल्यानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळबंली होती. अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी देवदूत बचाव पथक यंत्रणा व आयआरबी पेट्रोलिंग पथकासह महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्यांनी रुग्णालयात हलवण्यासोबतच महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कारचालक अंकुश जंगम याने हयगयीने, बेदारकापणे, निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन चालवून, लेनची शिस्त न पाळता अपघात घडवल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.