| अलिबाग । प्रतिनिधी ।
जेएसएम महाविद्यालय, अलिबाग येथील महिला विकास कक्ष आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती ह्यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात (दि.7) विद्यार्थीनींसाठी Polycystic ovarian syndrome (PCOS) ह्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन जयवंत केळुसकर सभागृहात करण्यात आले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.गौतम पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.पुष्पलता शिंदे उपस्थित होत्या. डॉ. सोनाली पाटील ह्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा पाटील ह्यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. शिंदे ह्यांनी विद्यार्थीनींना PCOS म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणे कोणती आणि त्याचा महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम काय होतो हे सविस्तर सांगितले. ह्या आजाराबद्दल मुलींनी कसे जागरूक राहावे आणि काय उपाय करावे व काळजी घ्यावी याबद्दलही मार्गदर्शन केले. डॉ. शिंदे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थीनीसोबत संवाद साधला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रोमिली गोसावी ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले. ह्या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थीनी व महिला विकास कक्ष व अंतर्गत समितीमधील प्रा. नम्रता थळे, प्रा. श्वेता मोकल, प्रा. दिक्षिता भोईर, श्रद्धा थळकर आणि संचिता टिवळेकर उपस्थित होत्या.