| माथेरान । वार्ताहर ।
दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे थंड हवेचे निसर्गरम्य गिरिस्थान माथेरान पर्यटकांनी गजबजले आहे. पर्यटक हिरवाईने नटलेले निसर्गसौंदर्य पाहण्याचा व गुलाबी थंडीची मजा लुटताना दिसत आहेत. मात्र माथेरानकडे येणार्या घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांना देखील थोडा त्रास सहन करावा लागत आहे.
दिवाळी हंगाम अगदी जोरात सुरू असून देशविदेशातील पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वाढली आहे. सध्या सलग दिवाळी सुट्ट्या आल्याने पर्यटक सहलीसाठी आकर्षित झाले आहेत. येथील प्रसिद्ध एको पॉईंट, शारलोट लेक, लुईझा पॉईंट, सूर्योदयासाठीचा सध्याचा प्रसिद्ध रामबाग पॉईंट आणि काही पर्यटक तर सूर्यास्तासाठी प्रसिद्ध शारलोट तलावाजवळील सिलिया पॉईंटला सुद्धा पसंती देत आहेत. तसेच माथेरानमधील मुख्य सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेल्या सनसेट पॉईंटवर सुद्धा पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे.
काही दिव्यांग पर्यटक आपल्या व्हीलचेअर किंवा हात रिक्षामधून येथे आपल्या आवडीच्या ठिकाणी भटकंती करताना दिसत आहेत. माथेरान मध्ये येणार्या पर्यटकांसाठी येथील लॉज आणि हॉटेल्सचे दर अगदी आवाक्यात असल्याने पर्यटक सुद्धा समाधान व्यक्तकरीत आहेत. त्याच प्रमाणे येथील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज यांना विद्युत रोषणाई केलेली पहावयास मिळत आहे. माथेरानचे मुख्य आकर्षण असणारी माथेरानची राणी म्हणजेच टॉय ट्रेन, मिनिट्रेन पर्यटकांना योग्य सेवा पुरवीत आहे.
शनिवार आणि रविवार शेवटचा विकेंड असल्याने या सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. या वीकेंडमध्ये मुंबई, पुण्यासह गुजरातचे पर्यटक देखील हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत.
आम्ही दरवर्षी या दिवाळी सुट्ट्यांमध्ये माथेरानला येतो. इथले निसर्गसौंदर्य खूपच आल्हाददायक आहे. नेरळ ते माथेरान मिनिट्रेन सुरू झाल्यामुळे पर्यटक संख्या वाढत आहे.
विनायक परब
पर्यटक, मुंबई