| चिरनेर | वार्ताहर |
जिल्हा क्रीडा कार्यालय अलिबाग आणि उरण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात (दि.10) तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन समीर खारपाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी आर.एन.पाटील, मुख्याध्यापक सुरदास राऊत, उपशिक्षक विद्याधर गावंड, संगीता म्हात्रे, शेखर म्हात्रे, सुनील जानकर तसेच विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व संघ व्यवस्थापक उपस्थित होते.
या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. बोरी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर, मोरा येथील जे.एम. म्हात्रे ट्रस्ट न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याचबरोबर आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. तर, सेंट मेरी जेएनपीटीच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्याचबरोबर उरण एज्युकेशन सोसायटी उरणच्या 19 वर्ष वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकाविला तसेच चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचे उद्योगपती पी.पी. खारपाटील, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र खारपाटील व सर्व शाळांच्या शिक्षक वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.