। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदरसंघातील बिनविरोध जाहीर झालेल्या 36 ग्रामपचायतीपैकी 32 ग्रामपंचायती या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटाकडे असल्याचा दावा आ. भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. यावेळी निवडणुकीत बिनविरोध आलेले सरपंच देखील उपस्थित होते.
36 बिनविरोध सरपंच हे आपल्या शिंदे गटाचे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या संघटनेचे असल्याचा दावा गोगावले यांनी केला आहे. ढालकाठी येथील आपल्या शिवनेरी निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुकाध्यक्ष सुरेश महाडिक, विजय सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, संजय कचरे माजी नगरसेवक नितीन पावले , पोलादपुर चे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे निलेश अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आपण केलेला विकास आणि असलेला जनसंपर्क याच्या माध्यमातून आपण मतदारांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध जाहीर झालेल्या 36 पैकी 32 ग्रामपंचायती या आपल्या पक्षात असल्याचा दावा देखील गोगावले यांनी केला. यापुढे बोलताना गोगावले यांनी गाव पातळीवर निर्णय घेऊन सरपंच बसवले असले तरी गावातील आमचे प्राबल्य कायम असून सरपंच देखील साहजिकच आमचा असेल असे सांगितले. भविष्यात महाड नगर पालिकेच्या निवडणुकीत देखील आपण यश संपादन करू असा विश्वास कार्यकर्त्यांना दिले.