। उरण । वार्ताहर ।
जेएनपीए बंदर परिसरात असणार्या अवजड वाहनांच्या पार्किंग सध्या गुन्हेगारी विश्वाच्या आश्रयस्थान बनल्या आहेत. या पार्कीग मध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत आहे.गर्दुल्ल्यांचा हा अड्डाच बनला आहे.यावर कारवाई करण्यात पोलीस यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
पार्किंगमध्य चरस, गांजा, दारूची खुलेआम विक्री होत आहे. पे पार्किंग चालविणार्या काही परप्रांतीय व्यक्तींनी या पार्किंगमध्ये वाहनाच्या भाड्यातून चांगले पैसे मिळत नसल्याने वाहने घेवून येणार्या ड्राइव्हर लोकांसाठी दारू विक्री बरोबरच गांजा,चरस विक्री सुध्दा मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यातून लाखोंचा मलिदा जमविला आहे. जे एन पी ए विभागातील बहुतेक पार्किंग मध्ये असणार्या टपर्यांमध्ये हे गोरखधंदे बिनबोभाट सुरू असल्याने जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे.
जेएनपीए विभागातील वाहनतळांवर(पार्किंग)अशा प्रकारच्या अंमली पदार्थ, दारूची विक्री होत असेल तर हा प्रकार गंभीर आहे. याबाबत योग्य तपास करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलिस आयुक्त, न्हावा शेवा बंदर विभाग