कार्यालयीन वेळेत शुद्धलेखनाचे धडे
| रोहा | प्रतिनिधी |
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांना शुद्धलेखनाचे शासकीय नियम व लेखन याचे धडे देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परीषद रोहा शाखा व युवाशक्ती रोहा यांनी व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाला सर्व शासकीय कर्मचार्यांनी कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत हजर राहण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिल्याने कर्मचार्यांना शुद्धलेखनाचे धडे आणि कामांसाठी ताटकळत रहावे लागल्याने जनता रडे अशी परिस्थिती रोहा तहसीलदार व प्रांत कार्यालयात फेरफटका मारला असता दिसून आली.
मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी उपक्रम जरूर राबविण्यात यावेत.पण कार्यालयीन वेळेत आयोजित या उपक्रमांसाठी रोहा तहसीलदार व प्रांत कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग दुपारी दोन वाजल्यापासून म्हाडा कॉलनी येथे गेल्याने शासकीय कामकाजासाठी आलेले नागरिक तीन तास ताटकळत उभे होते.सध्या शासकीय कार्यालयात संगणकावर कामकाज होत असल्याने कर्मचारी व अधिकारी वर्ग यांना प्रत्यक्ष लेखनाचा संबंध फार कमी येतो.तरी देखील शुद्धलेखनाचे शासकीय नियम काय याबाबत कर्मचारी वर्गाला माहिती द्यायची आवश्यकता असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त अशा प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन केले असते तर अधिक सयुक्तिक झाले असते.
मराठी भाषेचे संवर्धन करता करता जनतेच्या रागाचे मात्र वर्धन झाले आहे.अगोदरच शासकीय अधिकारी व कर्मचारी दैनंदिन मिटींग,व्हिडिओ कॉन्फरन्स, दौरे यामध्ये व्यस्त असल्याने नागरिकांना कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागतात.पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा करण्यात आला आहे. पण शासकीय कार्यालयात वेळेत एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र नेहमीचेच आहे.त्यातच आता अशा कार्यक्रमांसाठी कर्मचारी वर्ग कार्यालयीन वेळेत गेल्यास रोह्यातील नागरिकांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.