माऊली, ओम वर्तकनगर, शिवशक्ती, विश्वशांती यांना संमिश्र यश
| मुंबई । प्रतिनिधी ।
माऊली प्रतिष्ठान, ओम वर्तकनगर, शिवशक्ती महिला, विश्वशांती क्रीडा यांनी कामगार कल्याण केंद्र आयोजित महिला(शहर) विभागात विजयी सलामी दिली. तर रिझर्व्ह बँक, सिमेन्स, माटुंगा रेल्वे वर्कशॉप, बँक ऑफ बडोदा यांनी पुरुष(शहर) विभागात साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. माझगांव डॉकला संमिश्र यश प्राप्त झाले. प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या हुतात्मा बाबू गेनू क्रीडानगरीत सुरू झालेल्या महिलांच्या उदघाटनिय सामन्यात माऊली प्रतिष्ठानने अश्वमेध स्पोर्ट्सचा 42-32 असा पाडाव करीत विजयी सलामी दिली.
पुरुषां(शहर)च्या ब गटात रिझर्व्ह बँकेने महाकल्याण कबड्डी संघाला 33-23 असा पराभव करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. हिंदुजा रुग्णालयाने अ गटात आयुर्विमा महामंडळाला 47-09 असे सहज पराभूत केले. माझगांव डॉकने क गटात एमएसआरटीसीला 37-30 असे पराभूत केले. सिमेन्सने इ गटात महिंद्र ब्रदर्सला 55-22 असे नमवित बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले. माटुंगा रेल्वे वर्कशॉपने ड गटात मेट्रोपोलिटनचा प्रतिकार 39-25 असा मोडून काढला. या स्पर्धेचे उदघाटन आ. कलिदास कोळंबकर, विनिता वेद-सिंगल, डॉ. रविंद्रकुमार सिंगल, रविराज इळवे, पी.संतोष, शशांक साठे, दीपक पोकळे, जया व छाया शेट्टी, अशोक डोके, विश्वास मोरे आदीच्या उपस्थित होते.