प्रजासत्ताकदिनी करणार आत्मदहन
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पासाठी टाकलेल्या गॅसवाहिनीने बाधित झालेले पेण व खालापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. न्याय मिळाला नाही तर प्रजासत्ताकदिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा विचार करतील, असा निर्वाणीचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. रिलायन्सच्या दहेज ते नागोठणे अशी इथेन गॅसवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु, ज्या शेतकर्यांच्या जमिनीतून ही पाईपलाईन गेली आहे, त्यांना आर्थिक मोबदला देताना त्यांच्यावर अन्याय झाला आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. अनेक प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळालेला नाही, काही बाधितांना बनावट चेक देऊन फसवणूक करण्यात आली, बाधित जमिनीची दुरुस्ती करून दिली नाही, असे आरोप आंदोलकांनी केले आहेत.
यासंदर्भात शासन स्तरावर अनेकदा बैठका झाल्या. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. वेळोवेळी आंदोलने केली; परंतु काहीच पदरात पडले नाही. इतर प्रकल्पबाधितांना ज्या दराने मोबदला देण्यात आला, त्याच दराने या शेतकर्यांना मोबदला देण्यात यावा, असे कंपनी प्रशासनाला कळवूनदेखील कंपनीने त्याची अंमबजावणी केली नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांना कळवूनदेखील शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट, शेतकर्यांना आश्वासने देत आजपर्यंत केवळ दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
जनता दरबारातही न्याय नाही
अखेर 31 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात तक्रार करण्यात आली; परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. न्याय मिळत नसल्याने हा मार्ग निवडल्याचे आंदोलकांनी सांगितले. जर उपोषण करूनही न्याय मिळाला नाही, तर प्रजासत्ताकदिनी (26 जानेवारी) पेण व खालापूर तालुक्यातील 248 बाधित शेतकरी आत्मदहन करण्याचा विचार करतील, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.