| आगरदांडा | वार्ताहर |
तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेली आदिवासी वाडी याठिकाणी 2010 पासून ते आता पर्यंत स्वतंत्र अंगणवाडी इमारत अस्तित्वात नसल्याने येथील अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेच्या किचन रुम मध्ये 0 ते 6 वयोगटातील 27 बालकांना शिक्षण देत आहेत. परंतु याठिकाणी बैठकीची सुसज्ज व्यवस्था नाही यामुळे बालकाच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
इमारतीची अवस्था कोंडवाडा प्रमाणे जागेत शिक्षण घेत असताना बालकांना खुप अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तरी शासनाने आमच्या बालकांकरिता नविन अंगणवाडी इमारत बांधुन अडचण दुर करावी, अशी मागणी आदिवासी पालकवर्गाकडून होत आहे.
आदिवासी जमातीतील मुले बर्याचशा आदिम जमाती (आदिवासी) डोंगराळ-जंगली भागांत राहतात. या जमातींतील बहुसंख्य मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. निसर्गावर आधारित जीवनशैली, समाजापासून फारकत इत्यादी कारणांमुळे या परिवारांत जन्म घेतलेल्या मुला-मुलींमध्ये शिक्षणविषयक ओढ कमी असते. परंतु उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलीवाडी आदिवासी वाडीतील बालके मुले शिक्षण घेण्यासाठी पुढे असतात. परंतु शिक्षण घेत असताना आवश्यक असणारी शाळेची अंगणवाडी इमारत आजुन पर्यंत बांधली गेली नसल्याने आदिवासी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.
बेली आदिवासी करिता नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब नविन इमारत याठिकाणी बांधण्यात येईल.
मनिष नांदगावकर, सरपंच