| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
उपवनसंरक्षक रोहा श्री. अप्पासाहेब निकत यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मौजे देवघर ता. म्हसळा येथील सर्व्हे क्रमांक 1/3 येथे कॅपिझ शेल (Placenta) या सागरी वन्यजीव प्राण्याचे अवशेषांचा अवैध व्यापार चालू असल्याबाबतची माहिती मिळाली. याबाबत वनक्षेत्रपाल म्हसळा श्री. पांढरकामे व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी (दि.4) त्या ठिकाणी धाड टाकली असता घटनास्थळी ट्रक क्र. RJ22 GB2387 मध्ये कॅपिझ शेल (Placenta) या सागरी वन्यजीव प्राण्याचे अवशेष प्लॅस्टिक गोणीमध्ये भरून ठेवलेला आढळून आला. याबाबत अधिक चौकशी केली असता या ठिकाणी काही लोक या समुद्रजीवाच्या अवशेषांचा खरेदी विक्री व्यवहार करीत असल्याचे आढळून आले.
सागरी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील सूची क्र IV अन्वये प्रतिबंधित केला आहे. त्यामुळे घटनास्थळी खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या श्री. मुरलीधर महादेव महामूणकर, श्री. धनंजय मारुती बनसोडे, श्री. रोहित अरविंद सादरे, श्री. गोपाळसिंग पिरसिंज राजपूत, श्री. प्रेमदास श्रवणदास (राहणार-राजस्थान) यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,44, 48, 48A, 50(1)C51 नुसार गुन्हा नोंद करून त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. घटनास्थळी एकूण 30 ते 35 टन मुद्देमाल आढळून आला.
या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील अधिक तपास रोहा उपवनसंरक्षक श्री. अप्पासाहेब निकत व सहायक वनसंरक्षक श्री. विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.