| पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रस्त्यावर वाहतुक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला मदतनीस (वॉर्डन)देण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणीनमुळे या प्रस्तावावर अद्याप प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. त्यातच आता मदतनीसांच्या संख्येत वाढ करून द्यावी असा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून पनवेल पालिकेकडे पाठवण्यात आला असून, पूर्वी मान्य करण्यात आलेल्या 50 या संख्ये पेक्षा जास्त म्हणजे एकूण 160 मदतनीस पालिका हद्दीतील वाहतूक विभागाला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
झपाट्याने विकसित होत आलेल्या पालिका हद्दीतील वाहणाच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या वाहन संख्ये मुळे वसाहती अंतर्गत रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने याचा ताण वाहतूक पोलिसांवर पडत आहे.त्याच प्रमाणे पालिका हद्दीतुन जाणार्या महामार्गावरील वाहतुक नियंत्रण करण्याचे काम देखील वाहतूक पोलिसांनाच करावे लागत असल्याने वाहतूक विभागाकडे असलेल्या अपुर्या कर्मचारी संख्येला कामाच्या अतिरिक्त ताणाला सामोरे जावे लागत असल्याने पालिकेच्या माध्यमातून वाहतूक विभागाला 50 मदतनीस देण्यात येणार होते. या करिता पालिकेच्या माध्यमातून वर्षाला 59 लाख रुपये खर्च करण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव हा प्रकल्प बारगळलेला असताना वाहतूक विभागाच्या नवी मुबंई पोलीस आयुक्तालया कडून देण्यात आलेल्या नव्या प्रस्तावावर पालिका आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहणे औस्तुक्त्याचे ठरणार आहे.