| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, शहरात देवीचा जागर मोठ्या उत्साहात सुरू आहे. घरोघरी घटस्थापना, देवीची पूजा आणि मंदिरांमध्ये ओटी भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सणाच्या उत्साहातच पूजेसाठी आवश्यक असलेल्या नारळाच्या आणि सुक्या खोबऱ्याच्या किमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाचा खर्च भागवायचा की पुढील महिन्यात येणाऱ्या दिवाळीचे बजेट सांभाळायचे, असा प्रश्न महिलांसमोर निर्माण झाला आहे.
नवरात्रोत्सवात अनेक महिला श्रद्धेने देवीच्या मंदिरात जाऊन ओटी भरतात. या ओटीमध्ये नारळ, सुके खोबरे, हळद-कुंकू, खण आणि इतर पूजासाहित्याचा समावेश असतो. धार्मिक परंपरेनुसार देवीची ओटी भरण्याला विशेष महत्त्व असल्याने या काळात नारळ आणि खोबऱ्याला मागणी वाढते. मात्र, घाऊक बाजारातील दरांमध्ये वाढ झाल्यास त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे घरखर्चाचे गणित सांभाळताना सर्वसामान्य कुटुंबांची दमछाक होत आहे. त्यातच सणासुदीच्या काळात पूजासाहित्याच्या किमती वाढल्यास धार्मिक परंपरा जपतानाही खर्चाचा विचार करावा लागत आहे. देवीची ओटी भरायची, घरातील पूजाविधी पार पाडायचे आणि त्याच वेळी दैनंदिन खर्चही भागवायचा, अशी कसरत महिलांना करावी लागत आहे.







