| पाली /बेणसे | प्रतिनिधी ।
महिलांचे कर्तृत्व, जिद्द, संघर्ष आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणारा ‘नारी शक्ती सन्मान सोहळा’ पाली येथे गुरुवारी (दि.15) उत्साहात पार पडला. हॉटेल एडिशियाच्या वतीने आयोजित या विशेष सोहळ्यात प्रशासन, पोलीस सेवा, सामाजिक कार्य, आरोग्य, राजकारण, कृषी, क्रीडा आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यातील 22 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक आँचल दलाल, यांच्यासह डॉ. राजश्री कटके, अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, स्वप्निता गिरी, लता कळंबे आदी विविध क्षेत्रांतील प्रतिभावंत मान्यवर महिलांची या सोहळ्याला उपस्थिती लाभली. यांच्या उल्लेखनीय व प्रेरक कार्याचा गौरव ही या सोहळ्यात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नारी शक्ती सन्मान सोहळा आयोजनाचे कौतुक केले.
या नारी सन्मान सोहळ्यात अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, वर्षा मोरे, शीतल गायकवाड, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, ॲड. आरती गुप्ता, लता कळंबे, कांचन जाधव, तनुजा घरत, नाजुका गुरव, अश्विनी गाडगीळ, यांचा सन्मान करण्यात आला. संमोहनतज्ज्ञ डॉ. महेश काटे आणि डॉ. आरती काटे यांच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्याचा उद्देश केवळ महिलांचा सन्मान करणे एवढाच नव्हता, तर त्यांच्या संघर्षमय प्रवासातून समाजाला प्रेरणा देणे आणि महिला सक्षमीकरणाचा विचार अधिक व्यापक करणे हाही होता.







