। जम्मू । वृत्तसंस्था ।
सुमारे 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानवर तालिबानी राजवट प्रस्थापित झाली आहे. तालिबान च्या या राजवटीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये ही धोक्याची घंटा मानली जात आहे. यामुळे खोर्यात तैनात असलेल्या भारतीय लष्करावर चिंतेचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे.1990 मध्ये तालिबानी दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. मात्र, अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या तालिबानींविरोधात आता लढणे वाटते तेवढे सोपे नसल्याने भारतीय लष्करावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या 32 वर्षांत खात्मा केलेल्या 25 हजार दहशतवाद्यांमध्ये 13 हजार विदेशी दहशतवादी होते. त्यामध्ये सुमारे एक हजार तालिबानी दहशतवाद्यांचा समावेश होता. त्यावेळी दुसर्या क्रमांकावर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले होते. त्यानंतर खर्या अर्थाने दहशतवादी युगाची सुरुवात झाली होती, असे आकडेवारीनुसार समोर आले आहे. पाकिस्तानने तथाकथित स्वातंत्र्याच्या नावाखाली 27 देशांतील भाड्याचे तट्टू काश्मीरमध्ये घुसवले होते. त्यामध्ये सर्वाधिक पाकिस्तानी आणि अफगाणी नागरिकांचा समावेश होता. आता पुन्हा एकदा शेजारी तालिबानने आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या स्थानिक दहशतवादी आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयपुरस्कृत दहशतवादी संघटनांशी लढत असताना, आता तालिबानी दहशतवाद्यांचा धोका वाढला आहे. त्यामुळे भारतीय लष्कर तणावाखाली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांत पुन्हा उभारी देण्यासाठी पाकिस्तान तालिबान दहशतवाद्यांची मदत घेऊ शकते.
गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढणार्या सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय लष्करासाठी दहशतवादी हा दहशतवादीच असतो, तो पाकिस्तानी असो अथवा अफगाणी. गेल्या 32 वर्षांत 25 हजारांपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा भारतीय लष्काराने खात्मा केला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्याची कोणालाही संधी देणार नाही. विदेशी दहशतवाद्यांचा वापर करून आतापर्यंत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये घातपात घडवून मोठे नुकसान केले आहे. मदतीच्या नावाखाली तालिबानी दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये आमंत्रित करून खोर्याचा सत्यानाश करून आपल्या कारवायांतून पाकिस्तान खोर्यातील जनतेला त्रास देऊ शकते. त्यामुळे खोर्यात चिंतेचे सावट निर्माण झाले असल्याचा अहवाल भारतीय गुप्तचर संस्थांनी दिला आहे