बॅडमिंटन कोर्ट सप्टेंबरपासून सर्वांसाठी खुले
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून खारेपाट विभागात आंबेपूर येथे ऑलिंपिक साईजचे 50×50 फुटांचे दोन अद्ययावत सर्व सुखसोयी युक्त बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आले आहेत, अशी घोषणा चित्रलेखा पाटील यांनी केली. याचा शुभारंभ दि.1 सप्टेंबर रोजी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष, प्रतोद अँड. आस्वाद पाटील, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्या भावना पाटील, मा. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, युवा नेते सवाई पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमना पाटील, इतर ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या पुढे चित्रलेखा पाटील यांनी घोषणा करताना संगितले की, अद्ययावत बंदिस्त बॅडमिंटन कोर्टमध्ये बारमाही खेळता येवू शकते, बारमाही खेळता येणारा हा क्रीडा प्रकार आहे. या करिताचं स्थानिकांनी बॅडमिंटन कोर्टची मागणी केली होती. आपल्याकडे जास्त प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे इंडोर खेळांना जास्त प्राधान्य दिले गेले पाहिजे. आपल्याकडे चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत. मात्र, त्यांना खेळण्यासाठी चांगली अद्ययावत मैदाने नाहीत ही खंत होती. मात्र माझ्या माध्यमातून आजपर्यंत मी फुटबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, कबड्डी ग्राऊंड, मल्लखांब, व्हॉलीबॉल कोर्ट, स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट पीएनपी नागाव येथे संकुल आणि अलिबाग वेश्वी येथे संकुल बांधू शकली, आणि खेळाडूंना खेळण्याची संधी दिली याच्यात मला समाधान मिळते.
आपल्याकडे सुद्धा पी. व्ही. सिंधु, सायना नेहवाल, अश्विनी पोनप्पा, ज्वाला गुड्डा अशा देशाचे नाव उज्वळ करणारे कर्तुत्ववान बॅडमिंटन महिला आणि पुरुष खेळाडू तयार होऊ शकतात. जर त्यांना आपण चांगली सुविधा उपलब्ध करून दिली तर. माझी अशी इच्छा आहे की, आपल्या जिल्ह्यात सुद्धा असे खेळाडू घडले पाहिजेत. चांगले खेळाडू तयार होण्यासाठी चांगले कोच सुद्धा आपण या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून नेमणार आहोत. बॅडमिंटन कोर्टचे बहुतांशी काम पूर्ण झालेले आहे, सप्टेंबर मध्ये याचे उद्घाटन पार पडणार आहे आणि खारेपाट विभागाला बंदिस्त, अद्यावत, बारमाही खेळता येईल असे बॅडमिंटन कोर्ट मिळणार आहे .
चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख