श्रावण महिन्यात मोठी मासळी गायब

वादळी वातावरणाचा परिणाम

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

अद्याप समुद्रात मोठ्या प्रमाणावर ‌‘म्हावरा’ मिळत नसल्याने मासळीचे भाव वधारलेले दिसून येत आहेत. श्रावण सुरू झाल्याने मासळी मुबलक प्रमाणात मिळून भावदेखील खाली येतील अशी शक्यता सध्या तरी फोल ठरल्याचे मुरूड मासळी मार्केटमध्ये शनिवारी फिरताना दिसून आले आहे. सध्या बोंबील आणि पापलेट मासळी आधिक प्रमाणात दिसून येत आहे. हंगाम असूनही मार्केटमध्ये कोलंबी अजिबात दिसत नाही.

श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार करीत नसल्याने बाकीच्या मंडळींची चंगळ उडते. या महिन्यात मासळी भरपूर येते, असा अनुभव असल्याने काही मत्स्यप्रेमी मंडळी श्रावण पाळत नाहीत. अशी मंडळी मटण, चिकन खात नाहीत. मात्र, मासळी खाताना दिसतात. या महिन्यात पापलेट, बोंबील, कोलंबी, बांगडे अशी मासळी अधिक येते. मात्र, सध्या कोलंबी दिसून येत नाही. बोंबलांचा वाटा 100/- वरून रु. 50/- वर आला आहे. पापलेट जोडी 300 ते 400 रुपयांना विकली जात आहे. एकदरा, राजपुरी, दिघी, मुरूड समुद्रखाडीतील ताजे गटगटे बोंबील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येत असल्याने मत्स्यप्रेमींची खरेदीसाठी सकाळी किंवा दुपारच्या वेळेस गर्दी दिसत आहे. अनेकजण बोंबील मुरूड मार्केटला कोणत्या वेळी येणार याची पक्की माहिती घेऊनच हजर होताना दिसून येतात. बर्फाचा टच नसलेले ताजे बोंबीलच खाण्यात खरा चविष्टपणा आहे.

एकदरा गावचे मच्छिमार नाखवा रोहन निशानदार यांनी सांगितले की, 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली असली तरी मच्छिमारांनी सर्व नौकांची मासेमारी सुरू केलेली नाही. ज्या 30 ते 40 टक्के नौका जातात, त्यांना मोठी मासळी मिळत नाही. काही प्रमाणात पापलेट, बोंबील मिळतात. त्यामुळे फायदा कमी आणि मेहनत खंडीभर अशी अवस्था आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात मिळणारी सुरमईसारखी मोठी मासळी, कोलंबी बेपत्ता झाल्याचे निशानदार यांनी सांगितले. समुद्रात पाण्याला अद्याप प्रचंड वेग आहे, शिवाय वादळी वातावरण असून लाटा उसळत्या आहेत. अशा परिस्थितीत मासळी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे एकदरा येथील सुमारे 60 टक्के नौका अद्याप किनाऱ्यावरच आहेत. आमची श्रद्धा आहे की, आम्ही नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण करून दर्या राजाचे पूजन करू. त्यानंतर मासेमारीस निघणार आहोत, असे रोहन निशानदार यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version