| अलिबाग | प्रतिनिधी |
मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतजमीनी पाण्याने तुडूंब भरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना राब भाजण्यासह पेरणी करण्यास अडथळे निर्माण झाले होते. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून जिल्ह्यात ऊन जाणवत आहे. परिणामी शेतातील पाणी कमी झाले असून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची पुन्हा शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी पेरणीच्या कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, भात पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणांच्या खरेदीसाठीदेखील शेतकऱ्यांची धावपळ सूरू झाली आहे. त्यामुळे बियाण्यांच्या दुकानांत शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.