सराव, संचलनाने उजळला आसमंत
| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांनी बुधवार (दि.29) तारकर्ली समुद्रात सायंकाळी तेजस, मिग, डॉर्निअर, चेतक आदी एअरक्राफ्ट व हेलिकॉप्टरनी चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिल्ह्याभरातून आलेल्या नागरिकांचे, पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दांडी ते देवबागपर्यंतच्या किनारपट्टीवर आबालवृद्धांनी प्रात्यक्षिके पाहण्यास एकच गर्दी केली होती. त्याने संपूर्ण किनारपट्टी गजबजून गेली होती. नौदलाचा सराव पाहण्यासाठी तारकर्ली किनारी दुपारपासूनच नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यात दांडी, वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग किनारपट्टी भागात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक मुलांसह दाखल झाले होते.
सायंकाळी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित सर्वचजण भारावून गेले होते. प्रात्यक्षिके आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी किनारपट्टीवर सर्वांची चढाओढ सुरू होती. नौदलाचे मरीन कमांडो पॅराशूटमधून खाली उतरताच प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. निश्चित केलेल्या पॉइंटवर एकामागोमाग एक असे आकाशातून भारताचा तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकवत पॅराशूटद्वारे कमांडो खाली उतरले. यानंतर आकाशात तेजस, डॉर्निअर, मिग 29 के आदी एअरक्राफ्टनी आपल्या कसरती दाखविल्या. प्रात्यक्षिकांच्या एकापेक्षा एक सरस अशा सादरीकरणाला उपस्थितांकडून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. समुद्रात तयार केलेली दुष्मनांची चौकी बॉम्बच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून मरीन कमांडोंनी आपली क्षमता दाखवून दिली. याचबरोबर युद्धनौकांवरून होणारे हल्ले, शत्रूच्या हल्ल्याचा सामना करणे, समुद्री चाच्यांवर कमांडो हल्ला करणे, समुद्री बचाव, हेलिकॉप्टर कसरती अशा विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले.
प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातील नागरिकांना सुरक्षेच्या करणास्तव एमटीडीसी येथील मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास बंदी होती. त्यामुळे अनेक नागरिक दांडी, तारकर्ली, देवबाग येथील किनारपट्टीवरून पायी चालत प्रात्यक्षिके पाहण्यासाठी किनारपट्टीकडे दाखल होत होते. सर्वसामान्यांना प्रात्यक्षिके उद्याच्याच दिवशी पाहता येणार आहेत. त्यानंतर ही प्रात्यक्षिके 4 तारखेला पाहता येणार आहेत. त्यामुळे तारकर्ली किनारपट्टीवर जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
नौकांवर रोषणाई ध्रुव, चेतक, सी किंग या हेलिकॉप्टरबरोबर तेजस, डॉर्नियर, मिग 29 के आदी लढाऊ विमानांनी आपल्या कसरती दाखविल्या. सूर्यास्तावेळी राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. त्याचप्रमाणे 'सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा'या गीताचीही धून वाजविली. त्यानंतर समुद्रात नौदलाच्या युद्ध नौकांवरील रोषणाई सुरू झाली. ही रोषणाई आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
