पीएनपी नाट्यगृहात ग्रामीण नाट्यमहोत्सव; कलाकारांच्या कलाविष्काराला रसिकांची दाद
| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘नाट्यप्रभा’ ग्रामीण नाट्य महोत्सव 2026 ची पीएनपी नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली. पीएनपी कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील पुरस्कृत ग्रामीण रंगभूमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात अलिबाग तालुक्यातील 12 गावांतील 12 नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
दि. 18 ते 31 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या नाट्य महोत्सवाच्या सांगता सोहळ्याची सुरुवात विक्रांत वार्डे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विशेष नाट्याविष्काराने झाली. ‘ग्रामीण रंगभूमी’ हा विषय प्रत्यक्ष रंगमंचावर जिवंत करत महोत्सवाचा प्रवास रसिकांसमोर उलगडण्यात आला. महोत्सवात सादर झालेल्या 12 नाटकांतील प्रमुख कलाकारांनीही या विशेष कलाकृतीत सहभाग घेतला. ग्रामीण रंगभूमीची भूमिका तन्वी पाटील यांनी प्रभावी अभिनयातून साकारली. या भावस्पर्शी सादरीकरणाने उपस्थित रसिक भारावून गेले आणि सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
या महोत्सवात नाट्य हनुमान नाट्य मंडळ, भोनंगचे ‘गजा आला रे’, श्री शिवाई देवी कलामंच, बांधणचे ‘स्वप्न सुखाचे पाहताना’, भुवनेश्वर नाट्य कलामंच, मानकुळेचे ‘वेड्या भावाची वेडी माया’, हनुमान नाट्य मंडळ, मेढेखारचे ‘दीप तुझ्या वंशाचा’, अनंत सांस्कृतिक कलामंच, पेझारी-अलिबागचे ‘अजून अंधार दाटून आहे’, द मिरर थिएटर, थळ-वायशेतचे ‘करमरकर हाऊस’, धावीर नाट्य मंडळ, नांगरवाडीचे ‘माझा काय गुन्हा’, युगांतर सांस्कृतिक नाट्य मंडळ, बोरघरचे ‘विठ्ठल विठ्ठल’, लोकसेवा खिडकीचे ‘विदूषक’, सु-सागर सांस्कृतिक कलामंच, पेझारीचे ‘वेडा वृंदावन’, नवज्योत नाट्य मंडळ, नवखार तसेच कला विश्व नाट्य मंडळ, हाशिवरे यांनी सहभाग नोंदवत विविधांगी विषयांवरील नाटकांचे सादरीकरण केले.
सांगता सोहळ्यास चित्रपट निर्माते जितेंद्र म्हात्रे, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कला दिग्दर्शक केशव ठाकूर, डॉ. वाझे, नाट्य दिग्दर्शक किशोर म्हात्रे, साहित्यिक कैलास पिंगळे, विलास नाईक, शरद कोरडे, संदीप गोठीवडेकर, नागेश कुलकर्णी, प्रकाश म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पीएनपी कलाविकास मंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत वार्डे, ग्रामीण रंगभूमीचे अध्यक्ष राजन पांचाळ, महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रतिक पानकर, देवेंद्र केळूसकर, सागर नार्वेकर, संकल्प केळकर, जितेंद्र पाटील, दिनेश पाटील, ऋषी पडवळ, के.डी. पाटील, अमोल मिठाग्री, प्रमोद पाटील, दीपक काळेळ, अश्रिता बारसे, आरती पाठक, उपासना घोसाळकर, अनिष मिठाग्री, पप्पू पवनार, यश बनसोडे, अंश म्हात्रे, वरद ठाकूर, लक्ष्मण ढेरे, यज्ञेश थळे, उर्वव पाटील यांच्यासह ग्रामीण रंगभूमीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच संदेश मयेकर यांचेही आयोजनात मोलाचे योगदान राहिले.
यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि पीएनपी कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांनी सहभागी सर्व नाट्यसंस्था, कलाकार आणि आयोजकांचे अभिनंदन करत ग्रामीण रंगभूमी जपण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागात प्रचंड कलागुण दडलेले आहेत. या कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि ग्रामीण रंगभूमी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने ‘नाट्यप्रभा’ ग्रामीण नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच समाधान देणारा आहे. ग्रामीण रंगभूमी ही आपल्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा वारसा आहे. हा वारसा जतन करण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी पीएनपी कलाविकास मंडळ भविष्यातही अशाच उपक्रमांना प्राधान्य देईल.
चित्रलेखा नृपाल पाटील
अध्यक्षा, पीएनपी कलाविकास मंडळ
