सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
| खरोशी | प्रतिनिधी |
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पेणमधील सभासदांनी तालुक्यातील दुरशेत आणि खरोशी या पूरग्रस्त भागात जाऊन त्यांना जीवनावश्यक अन्नधान्याचे साहित्य वाटप केले.
आठ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसात पेण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पूरग्रस्त गावांमध्ये दुरशेत आणि खरोशी या गावांचा देखील समावेश होता. या गावांमधील जवळपास सत्तर टक्के नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरून घरातील अनेक वस्तूंसह दैनंदिन जीवनासाठी लागणारे अन्नधान्याचे काही सामान देखील पुरामध्ये वाहून गेले. तर अनेक प्रकारचे अन्नधान्य भिजल्यामुळे या नागरिकांचे अतोनात हाल झाले होते. या प्रकारानंतर शासनाचे पंचनामे सुरू असले तरी ते कधी पूर्ण होतील आणि त्यांना मदत कधी होईल याची साशंकता असल्याने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शेकडो मावळ्यांनी तालुक्यातील दुरशेत आणि खरोशी गावात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये कांदे, बटाटे, तेल, मसाले, मीठ, तांदूळ, खोबरे, लसुण, हळद, डाळी आदी जेवणासाठी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करून समाजाप्रती आपले असणारे कर्तव्य पार पाडले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी केलेल्या या अनमोल मदतीचे तालुक्यातील साऱ्याच नागरिकांकडून कौतुक होत आहे.







