| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात लंम्पी या चर्म आजाराने तब्बल सहा गोवंशीय जनावरे यांचे बळी गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात सर्व गोवंशीय जनावरे यांचे लसीकरण करण्याचे उद्धिष्ट पशुसंवर्धन विभागाने ठेवले आहे. त्यासाठी तालुक्यातील गोवंशीय आणि म्हैस वर्गीय जनावरे यांचे पशु पालक शेतकरी यांना आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यात आजही 17 गावात लंम्पी सदृश आजाराने बाधित जनावरे आहेत. दरम्यान, याबाबत पशुसंवर्धन विभागाने परिपत्रक काढले असून तालुक्यातील सर्व पशू पालक यांना तालुका पशुधन विभागाचे वतीने गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी केले आहे.
लम्पी आजार हा माशा, कीटक, चिलटे, गोचीड-गोमाशा यांच्या मार्फत तसेच बाधित जनावरांच्या थेट संपर्काने इतर निरोगी जनावरांमध्ये पसरत असल्याने, सर्व गोठे व परिसर स्वच्छ ठेवून गोठ्यात तसेच जनावरांच्या अंगावर, आवश्यक फवारणी इतर उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
त्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मार्फत आपल्या गावांमध्ये गाय-वर्गीय जनावरांमधील लंपी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण हे गायवर्गीय जनावरांमध्ये करण्यात आलेले आहे कि नाही याची खात्री करावे, असे आवाहान केले जात आहे. लसीकरणाच्या दिवशी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील/गावांमध्ये जनावरे चरावयास सोडल्याने किंवा अन्य कारणास्तव, कोणाची गाय वर्गीय जनावरे लसीकरण करणे बाकी असल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क करून तात्काळ गोवंशीय जनावरे यांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.