| केरळ | वृत्तसंस्था |
केरळच्या किनाऱ्याजवळ एक लायबेरियन मालवाहू जहाज पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. केरळमधील कोचीच्या किनाऱ्यापासून 38 नॉटीकल मैल अंतरावर एक लायबेरियन ध्वज असलेले कंटेनर जहाज (एमएससी एलएसए 3) हे शनिवारी (दि.24) झुकण्यास सुरूवात झाली होती.
हे जहाज आता पूर्णपणे पाण्यात उलटले आहे. इतकेच नाही तर यामधून तेल गळती होण्याचा धोका असल्याची माहिती रविवारी अधिकार्यांनी दिली आहे. या जहाजावरील सर्व क्रू सदस्यांना वाचवण्यात आले आहे. कोस्टल गार्ड्सनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजामध्ये वाहतूक केली जात असलेल्या 13 कंटेनर्समध्ये धोकादायक माल होता आणि 12 कंटेनर्समध्ये कॅल्शियम कार्बाइड होते. या दरम्यान केरळच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना किनाऱ्यावर वाहून आलेल्या वस्तूंपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान इंडियन कोस्ट गार्ड (आयसीजी)ने दिलेल्या माहितीनुसार, एका होल्डमध्ये पाणी शिरल्याने रविवारी सकाळी हे जहाज वेगाने पाण्यामधे उलटले.
प्रदूषण रोखण्यासाठी सर्व शक्यतांचा विचार करून राज्य प्रशासनाबरोबर मिळून काम केले जात आहे, अशी माहिती कोस्ट गार्डकडून देण्यात आली आहे. कोची येथील सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की नौदल आणि कोस्ट कार्ड हे तेलाची गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शनिवारी 24 पैकी 21 क्रू मेंबर्सना वाचवण्यात आले आणि उरलेल्या तीन जणांना रविवारी वाचवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
लायबेरियन ध्वज असलेल्या कंटेनर जहाज एमएशएल इएलएसए 3 मधील सर्व 24 क्रू सदस्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. कोचीच्या किनाऱ्याजवळ आज सकाळी हे जहाज बुडत असताना 23 जणांना इंडियन कोस्ट गार्ड आणि 3 जणांना भारतीय नौदलाच्या सुजाता या जहाजाने वाचवले. या जहाजात 640 कंटेनर्स होते ज्यामध्ये 13 कंटनर्स धोकादायक कार्गो आणि 12 हे कॅल्शियम कार्बाइडचे होते. यासह जहाजाच्या टाकीत 84.44 मेट्रिक टन डिझेल आणि 377.1 मेट्रिक टन फर्नांस तेल देखील होते, अशी माहिती कोस्ट कार्डनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.