। पालघर । प्रतिनिधी ।
मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील भाईंदर पूर्व नवघर स्मशानभूमी शेजारील कांदळवन परिसरात पालिकेचा बायोगॅस प्रकल्प बांधला आहे. तर, दुसर्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. ही दोन्हीही बांधकामे मँग्रोव्ह झाडे असलेल्या कांदळवनापासून 50 मीटरच्या आत बफर झोन क्षेत्रात येत आहेत. तसेच, पर्यावरण विभागाची व मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या पर्यावरणाचा ह्रास करत याठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नवघर येथे बायोगॅस प्लांट हा कांदळवन क्षेत्रात बांधला आहे. तसेच, याच बायोगॅस प्लांटजवळ महापालिकेने आणखी एका नव्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे. हे क्षेत्र पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मध्ये खारफुटीचा समावेश पर्यावरणाच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील श्रेणीतील आहे. पर्यावरण संवर्धन दृष्टीने आणि कांदळवन संरक्षणाच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेच्या आदेशाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने संबंधित महापालिकेचे ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्यांविरुद्ध कांदळवन झाडांची कत्तल व नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी धिरज परब व हर्षद ढगे यांनी केली होती.